मेटे यांच्या पत्नीचं सांत्वन केल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. मेटे यांचा फोन कधीही स्विच्ड ऑफ लागायचा नाही. पण अपघाताची बातमी समजल्यावर जेव्हा मेटे यांच्या पत्नीनं त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो बंद होता, असं मेटे यांच्या पत्नीनं सांगितल्याची माहिती पवारांनी दिली.
उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचं पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून मिळाली आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बीडमधील अजून एक दर्दी नेता हरवल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.