एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपनं बरीचशी महत्त्वाची मंत्रिपदं आपल्याकडे घेतली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यातुलनेत सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
२०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं. त्यावेळी फडणवीस यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व होतं. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल आणि मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ मंत्रिपद होतं. मात्र आता पाटलांना उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य अशी खाती देण्यात आली आहेत. तर मुनगंटीवारांना वनं, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे विभाग देण्यात आले आहेत.
शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी गेल्या आठवड्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी एकूण १८ जणांचा शपथविधी झाला. त्यात विखे-पाटलांनी सर्वात आधी शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना महत्त्वाचं खातं दिली जाणार अशी चर्चा सुरू झाली. त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.