मेटे फोर्ड एन्डेवेर कारमधून प्रवास करत होते. ही कार अतिशय दणकट मानली जाते. साडे चार वर्षांपूर्वी एका फोर्ड एन्डेवेरला कोल्हापुरात अपघात झाला होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये सिंधुदुर्गच्या कणकवलीकडे जाणाऱ्या एन्डेवेरला गगनाबावड्यात अपघात झाला. या कारमधून मुंबईजवळच्या वसई येथील एक कुटुंब प्रवास करत होतं.
जितेंद्र सिंह, त्यांची पत्नी, तीन मुलं, एक मित्र आणि चालकासह कोल्हापुरातून सिंधुदुर्गाला सुट्टीसाठी जात होते. सकाळी ६ च्या सुमारास एन्डेवेरला अपघात झाला. जितेंद्र चालकाच्या शेजारी बसले होते. गगनबावड्यात घाटावर तीव्र वळण असताना समोर अचानक एक ट्रक आला. कार आणि ट्रकची धडक होणार हे लक्षात घेऊन चालकानं कार डावीकडे वळवली.
रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेलं बॅरिकेडिंग तोडून थेट दरीत कोसळली. एन्डेवेर अनेकदा पलटली. यावेळी कारमधील सर्वच्या सर्व ६ एअरबॅग्स उघडल्या. कार जवळपास ४०० फुटांपर्यंत खाली गेली. मात्र सुदैवानं कोणालाही गंभीर स्वरुपाची इजा झाली नाही. सिंह यांची कार दरीत कोसळल्याचं पाहून ट्रक चालक तिथून फरार झाला. मात्र तिथून जाणाऱ्या अनेकांनी कार थांबवल्या आणि सिंह कुटुंबाला मदत केली. एका मोठ्या अपघातातून सिंह कुटुंब चमत्कारिकपणे बचावलं.