आरोपी पती सुदर्शन जाधव हा सध्या बारामती येथील रुई येथे बयाजी नगर येथे राहत आहे. जाधव हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील किणी येथील रहिवासी आहे.
दीपाली व सुदर्शन हे पती-पत्नी असून ते सध्या बारामतीत राहून काम करत उपजिविका करतात. २०११ साली त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. तेव्हापासून ते बारामतीतच राहतात. दिनांक १० ऑगस्ट रोजी पत्नी दीपाली या त्यांच्या दुचाकीवरून पेन्सिल चौकात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती कामाला गेले होते. सायंकाळी ते घरी आले असताना पत्नी घरात दिसली नाही.
पत्नी घरात नसल्याचे पाहून त्यांनी दीपाली यांना फोन करत चौकशी केली असता त्यांनी कामानिमित्त बाहेर आल्याचे सांगितले. रात्री पावणे आठच्या सुमारास त्या घरी परतल्या. त्यावेळी पती सुदर्शन जाधव याने आक्षेप घेतला. मला न सांगता तू घराबाहेर का गेलीस, असे म्हणत पती सुदर्शन याने पत्नी दीपाली यांच्या थोबाडीत मारली. मॉलमध्ये सेल लागला असून तेथे मी खरेदीला गेले होते, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर पतीने कोयता हातात घेत त्यांच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केले. हातावर कोयत्याने वार केले. त्यात तिची करंगळी व शेजारचे बोट तुटले. ती भितीने घराबाहेर पळून गेली.
या हल्ल्यानंतर आसपासच्या स्थानिक लोकांनी जखमी झालेल्या दीपाली जाधव यांना दवाखान्यात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.