आणखी अडीच दशकांनी भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी होईल. तेव्हा भारत कसा असेल, त्याने आपली जुनी स्वप्ने पुरी केली असतील का आणि तो कोणती नवी स्वप्ने पाहात असेल; याचा विचार आजच करायला हवा. याचा अर्थ, घटनाकार किंवा सगळ्या स्वातंत्र्यवीरांनी पाहिलेली स्वप्ने आज पुरी झाली आहेत, असे नव्हे. सर्वांना समान संधी, सामाजिक विषमतेचे उच्चाटन, आरोग्य-साक्षरता, कुपोषणाला कायमचा निरोप आणि गरिबीच्या रेषेखाली एकही कुटुंब राहू न देणे ही उद्दिष्टे आपण अजून गाठू शकलेलो नाही. देशात पंडित नेहरूंच्या पहिल्या सरकारपासून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारपर्यंत सर्वांनी आपापल्या परीने असंख्य चांगली कामे केली आहेत. ज्यांच्या डाव्या किंवा उजव्या डोळ्यांना रंगांधळेपणा आला आहे; त्यांचा अपवाद वगळता विकासाची ही वाटचाल कुणालाही दिसू शकेल. काही क्षेत्रांमध्ये तर ती थक्क करणारी आहे. भारतातली हरितक्रांती हे याचे एक उदाहरण आहे. १९५१ च्या सुपीक भूमी गमावलेल्या खंडित भारतातील ५० दशलक्ष टनांपासून आज जवळपास तीनशे दशलक्ष टनांपर्यंत आपण मजल मारली आहे. ती याहीपुढे जाणार आहे. ‘भारतात रस्तोरस्ती भूकबळी पडतील,’ हा पाश्चात्य विचारवंतांचा शाप तर यात खोटा ठरलाच; पण जगाच्या पाठीवर वावरताना भारतीय पंतप्रधानांच्या पाठीचा कणा या क्रांतीने ताठ ठेवला. या दृष्टीने इंदिरा गांधी यांनी केलेली बांगलादेशाची निर्मिती पाहावी. गेल्या दशकभरात भारतीय परराष्ट्र व संरक्षण धोरणात जी आक्रमकता आली आहे; तिच्या मागेही १९९१मध्ये सुरू झालेली अर्थक्रांती आहे. चीनला टाळून जसा जगाचा विचार करता येत नाही; तसाच भारताला बाजूला ठेवून जगाचा विचार करता येणार नाही. फरक हाच की, चीनमध्ये प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर हुकूमशाहीचा वरवंटा आहे. भारतात नवनवे धुमारे फुटणारी लोकशाही आहे. जगाच्या शाश्वत विकास आणि चिरंजीव समाधानासाठी निकोप लोकशाही महत्त्वाची आहे. भारताचे हे बलस्थान कधीही गमावता कामा नये. अभिव्यक्तीचे मुक्त स्वातंत्र्य ही लोकशाहीची निजखूण असते. तिला नख लावून आपण नांदू, असा भ्रम कुणालाही होऊ नये. याचे कारण, भारतीयांच्या जनुकांमध्येच लोकशाही आहे. इतके पराकोटीचे व अनंत प्रकारचे वैविध्य आविष्काराच्या स्वातंत्र्याविना युगानुयुगे कसे साकारेल? ही भारताची प्राचीन लोकशाही पुढच्या २५ वर्षांत जितकी सशक्त होईल, तितके ते देशहिताचे व जगाच्याही हिताचे ठरणार आहे.
भारत महासत्ता कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर पुढच्या दशकभरात मिळेल. आज भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. ती काही काळाने तिसऱ्या क्रमांकावर जाईल. प्राचीन काळी अनेक शतके भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वांत मोठी होती; या अभिमानाला खरा अर्थ केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे नव्हे; तर दरडोई उत्पन्नातील वाढीमुळे येणार आहे. त्याहीपेक्षा भूतानने स्वीकारलेली ‘सुखांका’ची कल्पनाही स्वीकारावी लागणार आहे. भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक घोडदौडीला हवामान बदलांचा मोठा लगाम बसू शकतो. यातील पाश्चात्यांच्या दडपणापेक्षा भारतीयांचे आरोग्य हाच महत्त्वाचा निकष असायला हवा. आज जगातील सर्वांत जास्त देशांमध्ये असणारे ‘परदेशी’ भारतीयच आहेत. या सगळ्यांचे अनुभव, कर्तबगारी आणि ज्ञान यांचीही मदत घेऊन भारताला ‘स्वच्छ, चिरंजीव आणि संतुष्ट’ विकासाचे प्रारूप पुढच्या काळात विकसित करावे लागणार आहे. त्यासाठी, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचे गंभीर आलोडन करावे लागणार आहे. या तत्त्वज्ञानाचे दैनंदिन जीवनात सर्वंकष उपयोजन करणारा आधुनिक ऋषी म्हणजे महात्मा गांधी. गांधी हा प्राचीन भारतीय मूल्ये आणि आधुनिक भारत यांना जोडणारा सर्वांत बळकट दुवा आहे. प्रसंगी या दुव्यात नवे धागे जोडत तो पुढे न्यावा लागेल. असे केले तरच सृष्टिबदलाचे संकट, आधुनिक माणसाची स्वप्ने आणि चिरकाल समाधानाची वाट या साऱ्यांची सांगड घालता येईल. बलवान, शक्तिसंपन्न व अर्थमहासत्ता बनलेला भारत आज ना उद्या जगाला ‘चिरंजीव भौतिक विकास आणि सफल मानवी जीवन’ अशी दुहेरी वाट दाखवू शकतो. मात्र, तसे होण्यापूर्वी भारतीय समाजाचेही नवसर्जन व्हायला हवे. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. तिला प्रामाणिक राज्यकर्ते, निष्पक्ष न्यायप्रणाली आणि सजग, सावध समाज नवे बळ देऊ शकतो. भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी होईल; तेव्हा भारताच्या भूमीवर केवळ गरजा पूर्ण झालेला नव्हे तर ‘आनंदाचे आवारू मांडू जगा’ असा समाज नांदायला हवा. आजच्या अमृताच्या दिनाचा तो सांगावा आहे.