सांगली : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर नवनिर्वाचित मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात भाजपचा वरचष्मा राहिला असून मलाईदार खाती भाजप नेत्यांकडे गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नाराजी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.

‘एकनाथ शिंदेंना किती जणांची मने आणि किती लोकांना सांभाळायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना समजून घेतलं पाहिजे,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे. तसंच विविध खात्यांचे मंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी उपलब्ध झाले, त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो, अशी खोचक प्रतिक्रियाही पाटील यांनी दिली आहे.

खातेवाटपानंतर शिंदे गटातील दादा भुसे नाराज? नॉट रिचेबल झाल्याची चर्चा

‘खातेवाटपाबद्दल कुठलेच मतभेद नाहीत’

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर विरोधी पक्षाकडून टीका सुरू झाल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘राज्यात खातेवाटपाबद्दल कुठलेच मतभेद नाहीत. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्याना असल्याने त्याप्रमाणेच खातेवाटप करण्यात आलं आहे. यात काही बदल करायचे असल्यास चर्चा करून ते करण्यात येतील’, असं देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात स्पष्ट केलं.

राजन विचारेंनी पोलिसांसह एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आणि मध्यरात्री शब्द खरा करून दाखवला!

‘मिळालेल्या खात्यांना सर्वच मंत्री न्याय देण्याचा प्रयत्न करतील. सध्या अर्ध्यापेक्षा कमीच मंत्रीमंडळ आहे. त्यामुळे सर्वांवर जास्त भार आहे. मात्र पुढील विस्तारात यावर तोडगा काढू. आमच्याकडे व शिंदे गटाकडे जी खाती अतिरिक्त आहेत, ती संबंधित पक्षातील भविष्यात येणाऱ्या मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदलाबदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ते करू. विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि योग्य वेळ पाहून ते ठरवतील’, असंही फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here