यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मी आज लाल किल्ल्यावरून माझ्या मनातील एक वेदना सांगू इच्छितो. मला माहितीये की, ही गोष्ट बोलण्याची ही जागा नव्हे. पण मी माझ्या मनातील दु:ख देशवासियांना नाहीतर कोणाला सांगणार? अलीकडच्या काळात आपल्यामध्ये एक प्रकराची विकृती निर्माण झाली आहे. आपण बोलण्या-चालण्यात, दैनंदिनं व्यवहारात, आपल्या काही शब्दांमुळे स्त्रियांचा अपमान करतो. ही गोष्ट घडता कामा नये. त्यामुळे आपण आपला स्वभाव, संस्कार, दैनंदिन जीवनातील स्त्रियांचा अपमान करणाऱ्या गोष्टींचा त्याग करु शकतो का? आपण या गोष्टींपासून मुक्तीचा संकल्प घेऊ शकतो का?, हा प्रश्न पंतप्रधान मोदींनी देशवासियांना विचारला. स्त्रीचा गौरव हा आगामी काळात राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठीची पुंजी ठरेल. हे मोठे सामर्थ्य आहे, मला ही गोष्ट दिसत आहे. त्यामुळेच मी स्त्रियांच्या सन्मानाचा आग्रह धरत आहे. आपण मुलींना आणि मुलांना समान वागणूक दिली पाहिजे. त्याशिवाय विविधतेत एकदा हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींचा देशवासियांना कानमंत्र, पंचप्राण जपा!
आगामी काळात भारताच्या विकासाच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंचप्राण’ या नव्या संकल्पनेनुसार वाटचाल करण्याची घोषणा केली. पहिला पंचप्राण म्हणजे, यापुढे देशाने खूप मोठे संकल्प निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. तरच भारताचा विकास शक्य आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दुसरा पंचप्राण म्हणजे देशवासियांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेही गुलामीचा अंश असू नये. प्रत्येकाने आपल्या मनातील गुलामीची जाणीव काढून टाकली पाहिजे. शेकडो वर्षांच्या गुलामीमुळे आपल्या मनात अनेक विकृती तयार झाल्या आहेत. ही गोष्ट आपल्या मनातून शतप्रतिशत काढून टाकली पाहिजे. त्यामुळे यापुढे देशात गुलामीचे प्रतिक असलेली कोणतीही गोष्ट आढळून आली तर ती काढून टाकुयात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
तिसरा पंचप्राण म्हणजे आपल्याला देशाच्या वैभवशाली वारशाबद्दल गर्व असला पाहिजे. याच वारशामुळे भारताने सुवर्णकाळ पाहिला आहे. हा वारसा काळानुसार समृद्ध होत आला आहे. त्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. चौथा पंचप्राण म्हणजे देशाची एकता आणि एकजुटता. देशातील १३० कोटी जनतेमध्ये एकता असली पाहिजे. देशात परकं कोणी नसलं पाहिजे. ही एकता असेल तर भारत श्रेष्ठ होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पाचवा आणि शेवटचा पंचप्राण म्हणजे नागरिकांना कर्तव्याची जाणीव होणे. देशातील नागरिकांना आपल्या कर्तव्यांची जाणीव झाली तरच देश पुढे जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.