कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील एका गावाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा घेण्यात येऊन यामधे बाल विवाहविरोधात ठराव करण्यात आला. बालविवाहाच्या विरोधात ठराव करणारे पिंपळगाव हे पहिलेच गाव असून बालविवाह खेळत्या बागडत्या मुलीवर होणारा आघात असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केलं.

महिलांच्या आवाहनानुसार काल पिंपळगाव येथे विशेष महिला ग्रामसभा घेतली गेली. या महत्त्वाच्या प्रसंगी गावातील बहुतांश महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी आणि विशेष म्हणजे गावातील बहुतांश महिलांनी या ग्रामसभेचे नियोजन केले होते. गेल्या साडेचार वर्षात पाचही महिला ग्रा. प. सदस्यांना उपसरपंचपदी संधी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Independence Day:स्त्रियांचा अपमान करण्याची सवय सोडा, मुलगा आणि मुलीला समानतेने वागवा: पंतप्रधान मोदी

सामाजिक कार्यकर्त्या ॲड. दिलशाद मुजावर यांनी उपस्थित महिला, मुली, ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक, मंडळ अधिकारी अंजली धादनकर, अनेक पुरुष मंडळींच्या उपस्थितीत पिंपळगाव येथे बाल विवाह होणार नाही अशी शपथ दिली. तसंच गावात विधवा प्रथा बंद व विधवांना “पुर्णांगिणी” या संज्ञेने बोलावले जावे व त्यांचे सौभाग्याचे अलंकार व लेणं समाजाने परिवर्तनाचा नवा पायंडा म्हणून पतीच्या निधनानंतरही तसेच राहू द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत एक महिला उत्स्फुर्तपणे व्यासपीठावर आली व सभेत एका विधवेने तिला हळदी कुंकू लावावे असं आवाहन केलं. तिच्या या कृतीवर उपस्थित ग्रामस्थांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली. एका पुर्णांगिणीने तिला हळदी कुंकू लावले.

दरम्यान, यावेळी ॲड. मुजावर म्हणाल्या, गेली अनेक वर्षे मी महिला, मुली, तृतीयपंथीयांसाठी काम करते. पण या ऐतिहासिक प्रसंगी मला गावाने बोलावलं व अशा भगिनी स्वतः पुढे येऊन असे सांगतात हा प्रसंग मी पहिल्यांदाच अनुभवते. ही परिवर्तनाची नांदी कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदा घडते आहे व मीही त्याची साक्षीदार आहे. ही मी आजवर केलेल्या छोट्याशा कामाची ही नवी पहाट आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, महिला व मुलींनी बाल विवाह व विधवा प्रथेच्या विरोधात सार्वमताने या विशेष महिला ग्रामसभेत ठराव केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here