नंदुरबार : एकीकडे अवघा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर सातपुड्याच्या दुर्गम भागांत नदीवर पूलच नसल्याने शाळेत कसे जायचे, हा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न अजूनही कायम होता. मात्र नंदुरबार पोलिसांनी निसर्गाचे हे आव्हान स्वीकारले आणि कोणत्याही मदतीची वाट न पाहता पोलिसांनी ४ दिवसात शाळेकडे जाणाऱ्या नदीवर पूल उभारुन आदिवासींना खऱ्या अर्थाने शिक्षणाचे स्वातंत्र्य प्राप्त करुन दिले आहे.

काल्लेखेतपाडा हा सातपुड्यातला धडगाव तालुक्यातला अतिदुर्गम आदिवासी परिसर. अनेक समस्या ठासून भरलेला हा भाग. गरोदर महिलेस खांद्यावर बांबूच्या झोळीतून पायी कित्येक मैल दवाखान्यात घेऊन जावे लागते. परवाच एका महिलेने अशा झोळीतच बाळाला जन्म दिला. इथे मनुष्याला जन्मतःच समस्यांशी ओळख होते. परंतु कितीही त्रास झाला तरी तक्रार करणे हे त्यांच्या रक्तातच नाही.

मागील आठवड्यात या परिसरातल्या पाड्यातल्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्यामुळे पावसाने आलेल्या पाण्यातून शाळेत जावे लागत होते. या पाण्यातून वाहत आलेले साप, विंचू यांच्या भीतीने मुलांनी शाळेत जाणेच बंद केल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना समजले. त्यानंतर पाटील यांनी परिचितांकडून लोखंडी साहित्य जमा केले. जवळपास वेल्डिंगची व्यवस्था नसल्याने काल्लेखेतपाडापासून तब्बल ७० कि.मी. वरील शहादा येथून हे साहित्य वेल्डिंग करुन ५० फूट लांबीचा पूल तयार करुन आणला. तो बसवण्यासाठी सातपुड्याच्या डोंगरात मजूर मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनीच ३ दिवस श्रमदान केले व शिक्षण आणि वंचित आदिवासी यांच्यातली दरी संपवून हा ऐतिहासिक सेतू तयार झाला.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घराणेशाहीवर टीका, अजितदादांचं तात्काळ प्रत्युत्तर , म्हणाले…

पोलिसांची चिकाटी पाहून मग शिक्षक व मुलेही मदतीला धावली. डोंगरदऱ्यातला आदिवासी आणि शिक्षणाच्या पर्यायाने विकासाच्या मार्गातला अडथळा दूर करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला.

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील स्वतः गावात आले. पुलावर लावलेल्या तिरंग्याच्या साक्षीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला “भारतमाता की जय” च्या घोषात काल्लेखेतपाडा गावचे जेष्ठ आदिवासी नागरिक वेल्ज्या बद्या पावरा (वय ९०) व इ.५ वी ची विद्यार्थिनी सुवर्णा माका पावरा या दोघांच्या हस्ते पूलाचे उद्घाटन केले. त्यानंतर काल्लेखेतपाडाच नव्हे तर आजुबाजूच्या गावातले गावकरी आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

दरम्यान, नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांची ही सेतूची संकल्पना अंमलात आणण्यासाठी धडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व त्यांच्या टीमने मेहनत घेतली. यावेळी पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत, पो.नि. रविंद्र कळमकर हे उपस्थित होते. चांगल्या उपक्रमांमुळे नंदुरबार पोलीस सतत चर्चेत असतात. परंतु गेल्या ७५ वर्षात मोठे पोलीस अधिकारी गावात आल्याचे लोकांनी पहिल्यांदाच पाहिले, तेही सोबत अनोखी भेट घेऊन. आदिवासींच्या झोपडीपर्यंत शिक्षणाचा सेतू नव्हे तर महामार्ग नेणाऱ्या नंदुरबार पोलिसांचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here