कुमारी सेजल बक्श या पदवीधर तृतीयपंथीयास सेतू सुविधा केंद्राचा कार्यभार सोपविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच होतकरू तृतीयपंथीयास सेतू सुविधा केंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात आली. ज्यामुळे, नागरिकांची तर सोय झालीच पण तृतीयपंथीयांच्या जीवनात सन्मानाने जगण्याची व स्वयंरोजगाराची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. या अद्यावत सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन पार पडताच चार लाभार्थ्यांनी विविध प्रकारची प्रमाणपत्रे ऑनलाईन काढून देण्याचा शुभारंभ केला व त्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे ठाकूर, डॉ. शालिनी इटनकर, जात पडताळणी संशोधन अधिकारी आऊलवार, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण लातूर प्रतिनिधी गोडबोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तृतीयपंथियांच्या सेतू सुविधा केंद्राचा प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. तेजस माळवदकर, बापू दासरी समाज कल्याण अधिकारी, दिनेश दवणे आणि सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आयटी सोल्युशन्सचे आकाश बागडे आणि संस्थेचे गोधने यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. यावेळी उपस्थित तृतीयपंथीयांच्या गुरू गौरी बक्श आणि इतर त्यांचे सहकारी भावूक झाल्याचं दिसून आले. तृतीयपंथीयांच्या विकासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
तृतीयपंथीयांना अंत्यविधीसाठी पूर्वी हैद्राबादला जावे लागत असे. आता त्यांना चार एकर स्वतंत्र स्मशानभूमीची जागा नांदेड येथील बोंडारपाटी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. किन्नर भवनासाठी पण जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांना मतदान कार्ड ,आधार कार्ड, ओळखपत्र देण्याचे काम सुद्धा हाती घेऊन पार पाडले आहे. हा उपक्रम जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने राबविण्यात आला आहे.