गिरगावात असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी आरोपीनं पहिला कॉल केला. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला संपवू अशी धमकी त्यानं दिली होती. याची माहिती मिळताच मुंबई पोलीस अलर्ट झाले. कलम ५०६ (२) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन काही केंद्रीय तपास यंत्रणांनादेखील याची माहिती देण्यात आली.
विष्णू भौमिकला बोरिवली पश्चिमेतून अटक करण्यात आली आणि त्याला डी. एम. मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्याची चौकशी सुरू आहे. भौमिकला अटक करण्यात आली असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का, याचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. धमकी देताना भौमिक यांनी एकदा धीरुबाई अंबानी यांच्या नावाचाही वापर केला.
गेल्या फेब्रुवारीत मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद कार आढळून आली. त्या कारमध्ये जिलेटिनच्या २० काड्या आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. महाराष्ट्र एटीएससह एनआयएनं या प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. एनआयएच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित झालं.