अटक करण्यात आलेला रेल्वेचा निलंबित अधिकाऱ्याचे नाव रॉबर्ट उबल्डो रोझीरिओ असे असून तो खडकी येथील रहिवासी आहे. या अगोदर या गुन्ह्यात सोनाली उमाकांत जाधव (रा. सांगवी), पूजा गरुड (रा कोथरूड), संगीता नगरकर (रा कोथरूड), नवनाथ लांडगे (रा पौड), मेहुल गांधी आणि सतीश मुकेरकर यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सुभाष गुलाब ससार (वय 49, रा. सुसगाव, मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे.
या फसवणुकीच्या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांचे भाऊ प्रकाश गुलाब ससार, राजेश गुलाब ससार यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासोबतच ‘आरपी’ नावाच्या धातूचे मौल्यवान भांडे नासा या अमेरिकन संशोधन संस्थेला विक्री करण्यात येणार असून त्याची किंमत ५००० कोटी मिळणार इतकी मिळणार आहे, असे सांगितले. त्यामधून ससार बंधूंना ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळणार असल्याचे आमिष त्याने दाखवले होते. त्यांचा विश्वास निर्माण करण्यासाठी त्याने १०० कोटींची बनावट कागदपत्रे बनवून घेत ती ससार बंधूंना त्याने दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून रॉबर्ट उबल्डो रोझीरिओ हा पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच तो मोबाइल आणि राहण्याची जागा सतत बदलत होता. तसेच गोवा आणि बंगलोरमध्ये तो राहत होता. मात्र पोलिसांना हा दापोडी येथे रहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले आहे.