ज्योती मेटे यांचा मुख्य आक्षेप विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या वेळेबद्दल आहे. आम्हाला कळवण्यात आलेली अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष अपघाताची वेळ यामधील टाईम गॅपची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. अपघात झाल्याचे कळताच मी पाऊण तासात मुंबईतून कामोठे रुग्णालयात पोहोचले. मी स्वत: डॉक्टर आहे. वैद्यकीय निकषांप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा चेहरा लगेच पांढारफटक पडत नाही. विनायक मेटे यांना कामोठे रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्त वाहत होते. तेव्हाच मी माझ्या भावाला म्हणाले की, ही घटना पाऊण तासापूर्वी घडलेली नाही. हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. तेव्हा आमच्यापासून काहीतरी लपवले जात आहे, असे वाटत होते. कदाचित तसे नसेल. आता शवविच्छेदन अहवालात मृत्यूची नेमकी वेळ कळेलच, असे ज्योती मेटे यांनी म्हटले.
दीपाली सय्यद यांच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त
विनायक मेटे यांचा अपघात नव्हे तर घातपात होता, असे आरोप सातत्याने सुरु आहेत. पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दीपाली सय्यद यांनीही विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.