ncp hasan mushrif, ‘अमूल’ला टक्कर देण्यासाठी हसन मुश्रीफांनी ‘प्लॅन’ सांगितला आणि सुरुवात स्वत:पासूनच केली! – ncp leader hasan mushrif bought two buffaloes after an appeal at the gokul meeting
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. गोकुळसमोर अमूल या ब्रँडने मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्याभरापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी नवीन म्हशी खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुश्रीफ यांनी दोन म्हशी खरेदी करत या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून केली. मुश्रीफ यांच्याकडे आता आधीच्या आठ आणि नवीन दोन अशा १० म्हशी झाल्या आहेत. जिल्ह्याबाहेरील बाजारातून आणलेल्या या दोन म्हशींचे हसन मुश्रीफ यांनी गैबी चौकात स्वागत केले.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळमधील महाविकास आघाडीच्या सत्तेला आता तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले. दूध उत्पादन वाढवण्यासाठी म्हशी वाढवणे गरजेचे आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सर्व संचालक व कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना म्हशी घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात येऊन एक वर्ष झाले. संघाने एक वर्षात केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा आम्ही यापूर्वीच मांडलेला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये २० लाख लिटर म्हशीच्या दुधाचे मार्केट उपलब्ध असल्याची आमची आता खात्री झालेली आहे. अशातच अमूल दूध संघासारखे फार मोठे आव्हान गोकुळ दूध संघासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळेच म्हशीचे दूध वाढवण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो, तर गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल. बाळासाहेब थोरातांनी विखे-पाटलांचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले,’माझ्या काळातील कामाची चौकशी करा’
‘अमूल’चं आव्हान कसं मोडून काढणार?
अमूल दूध संघाच्या रणनीतीविषयी बोलताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, ”अमूल’ने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतलेली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. अमूलसारखा एवढा मोठा प्रकल्प तर आम्ही उभा करू शकत नाही. परंतु त्यांना उत्तर द्यायचे असेल तर म्हशीच्या दुधाची उत्पादनवाढ करावीच लागेल. गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान मोडून काढण्यात आपल्याला यश मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षापासून आम्ही सत्तेवर आल्यानंतर म्हशीच्या दुधाला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला पाच रुपये दरवाढ केली आहे. या वेळेला चांगला दूध दरफरक देण्याचा मानस चेअरमन आणि संचालक मंडळाने केलेला आहे. या दूध उत्पादनवाढीच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहकार्य करा. गोकुळ हा देशातील एक नंबर ब्रँड होण्यासाठी हातभार लावा, असं आवाहनही हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं आहे.