चंद्रपूर : देशाला १५ आॕगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्या आधीच चंद्रपुरातील चिमूर हे ठिकाण ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालं होतं. क्रांतीचा हा इतिहास चिमूरच्या स्वागतद्वारावर कोरला गेला आहे. परंतु देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना चिमूरच्या स्वागतद्वारावर स्वातंत्र्यदिनी तिरंगा झेंडाच लावला गेला नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजन-कीर्तनाने १९४२ मध्ये चिमूर येथील जनता इंग्रज सरकारविरोधात पेटून उठली. जनतेने मोर्चा काढत आपला असंतोष व्यक्त केला. या मोर्चावर इंग्रज सरकारने लाठीमार आणि गोळीबार केला. यानंतर या उठावाची ठिणगी पेटली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी इंग्रजांच्या चार अधिकाऱ्यांना पूर्वीचे डाकघर आणि आताचे विश्रामगृह येथे डांबले आणि अख्खे डाकघरच पेटवून दिले. या चारही अधिकाऱ्यांचा तिथेच मृत्यू झाला. तर उरलेल्या शिपायांना शहरातील लोहापूल इथपर्यंत आणून पळवून लावण्यात आले. चिमूर हे स्वतंत्र झाले याची घोषणा खुद्द सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीच्या बर्लिन रेडिओ स्टेशनवरून केली.

आयशर ट्रक विनायक मेटेंच्या गाडीला कट मारत होता, पाठलागही केला, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याचा खळबळजनक दावा

त्यानंतर इंग्रज सरकारने येथे लष्कर पाठवत हे आंदोलन मोडून काढले. यामध्ये बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार, बाबूलाल झिरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या प्रकरणात इंग्रज सरकारने २०० जणांवर खटला चालविला. तसंच २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. या क्रांतीचे स्मारक चिमूर शहराच्या मध्यभागी साकारण्यात आले आहे, तर या क्रांतीचा इतिहास चिमूर शहराच्या प्रवेशद्वावर कोरण्यात आला आहे.

दरवर्षी या क्रांतीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी १६ ऑगस्टला येथे कार्यक्रम आयोजित केला जातो. आज येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरी, प्रत्येक शासकीय कार्यालयात तिरंगा फडकवण्यात आला. मात्र शहिदांच्या क्रांतीचा उजाळा देणाऱ्या प्रवेशद्वारावर तिरंगा फडकवण्यात आला नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याबाबत अशी उपेक्षा झाल्याने परिसरात टीकेचा विषय ठरला आहे. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे जनसामान्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here