सोलापूर जिल्ह्यातील अवनी नकाते या नऊ वर्षीय मुलीला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. तिचं ह्रदय वयोवृद्ध व्यक्तीसारखं कमकुवत होतं. डॉक्टरांनी ही बाब अवनीच्या पालकांना सांगितली. त्यावर शस्त्रक्रिया केल्याशिवाय मार्ग नसल्याचेही सांगितले. अवनीच्या पालकांनी तिला तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं होतं. मुंबईतील डॉक्टरांनी देखील तिच्या अनेक चाचण्या केल्या. अवनीवर बायपास सर्जरी केल्याशिवाय पर्याय नसल्यांचे तिच्या पालकांना सांगितलं.
सर्जरी केल्यानंतर अवनीला नवजीवन
नऊ वर्षाच्या रुग्णावर अशा प्रकारची सर्जरी करणे खूपच धोकादायक होते. अवनीच्या पालकांनी हिम्मत करून सर्जरी करण्याची संमती दिली. मुंबईतील डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर बायपास सर्जरी केली. सर्जरी नंतर अवनीला नवजीवन मिळाले असून वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्वात दुर्मिळ घटनांपैकी एक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
अवनीला हायपर कोलेस्ट्रोलमिआ आजार…
अवनीला हायपर कोलेस्ट्रोलमिआ हा आजार झाला होता. त्यामुळे तिच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली होती. यामुळे अवनीला ह्रदयविकाराचा जबरदस्त झटका आला होता. अवनीची कॉलेस्ट्रॉल लेवल ६०० पेक्षाही जास्त होती. डॉक्टरांनी वेळेत बायपास सर्जरी करून अवनी नकातेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. इतक्या मोठा धोक्यातून बाहेर आलेली सर्वात कमी वयाची रुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.