मुंबई : एरव्ही फोन केल्यानंतर सगळ्यांच्या तोंडातून आपसूकच ‘हॅलो’ असा शब्द उच्चारला जातो. पण सध्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कमालीचे संभ्रमात सापडले आहेत. त्याला कारण ठरलाय महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं फर्मान… सगळा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तसेच देशवासियांच्या देशभक्तीला उधाण आलेलं असताना सगळ्यांनीच गुलामीची मानसिकता सोडून तसेच इंग्रजांचे शब्द टाळून हॅलो ऐवजी आता वंदे मातरमने आपल्या संभाषणाची सुरुवात करावी, असं फर्मान सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांना सोडलं. त्यांच्या आदेशानंतर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या वंदे मातरमला आता काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रगीत- वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे, मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना आणि जनतेशी संवाद साधतांना ‘जय बळीराजा’ म्हणावे, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले आहेत. जगाचा पोशिंदा बळीराजाच्या सन्मानार्थ आपण जय बळीराजा म्हणून आपल्या संभाषणाची सुरुवात करावी, असं नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

वंदे मातरमला आमचा विरोध नाही, असं सांगताना देशावर आमचं निस्सीम प्रेम आहे, आमच्यातही प्रखर राष्ट्रभक्ती आहे. पण जगाच्या पोशिंदा बळीराजाच्या सन्मानार्थ आम्ही ‘जय बळीराजा’ म्हणण्याचे आदेश दिल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

आता फोन उचलल्यावर ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणायचं; मंत्री मुनगंटीवारांच्या सांस्कृतिक खात्याचा पहिला निर्णय
सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश काय?

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं संपूर्ण देशभरात दणक्यात सेलिब्रेशन होत असतानाच इकडे महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता सरकारी कार्यालयात फोनवर ‘नमस्कार’ करण्याऐवजी ‘वंदे मातरम’ बोलायचं, असं निर्णय मुनगंटीवारांच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणलाय… मी फोन उचलल्याबरोबर ”हॅलो” म्हणतो.. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचं स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रुपाने दिलं. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही. म्हणून आज सांस्कृतिक विभागाच्या मंत्रालयाचा मंत्री म्हणून पहिला निर्णय जाहीर करतोय, आता हॅलो नाही… वंदे मातरम बोलायचं….!, असं मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here