आज मंगळवारी सकाळी गावातील ग्रामस्थ पुलावरून प्रवास करताना त्यांना संशय आला आणि ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकहून काच घेऊन आलेली पिकअप गाडी पिंपरणे येथे माल खाली करून काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान माघारी निघाली. मात्र, ती गाडी पुन्हा नाशिकला पोहचली नाही. पुलाला असलेले छोटे कठडे तुटलेले असल्याने आणि चालकाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच परिसरात दाखवत असल्याने ही गाडी नदी पात्रात कोसळली असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे.
नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. मात्र, नदीवरील पुलाला सुरक्षित कठडे नसल्याने ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तिघांसह पिकअप वाहून गेल्याची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.