जेव्हा सामंत शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना गोड वाटत होते, आणि आता ते शिंदेंसोबत गेले त्यावेळी त्यांची टक्केवारी राऊतांना आठवली काय?, असा खडा सवाल उपस्थित करून मातोश्रीची दलाली करणाऱ्या खासदार राऊत यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव घेण्याची तरी लायकी आहे काय? असा टोलाही नागरेकर यांनी लगावला आहे.
उदय सामंत यांच्यावर टिका करताना खासदार राऊत यांनी उदय सामंत हे शिवसेना फोडत होते, राणे समर्थकांना पोसत होते असे वक्तव्य केले आहे. राऊत यांच्या त्याच वक्तव्याचा खरपूस समाचार नागरेकर यांनी घेतला आहे.
आठ वर्षे खासदार म्हणून काय केले, हे सांगण्याऐवजी केवळ टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या खासदार राऊत यांनी किती बेरोजगारांना रोजगार दिले, कोणते उद्योग मतदार संघात आणले, हे अगोदर सांगावे असे आव्हानही नागरेकर यांनी दिले आहे. मतदार संघात कोणतेही विधायक काम नाही, विकास नाही, केवळ हा खासदार विदूषकाची भुमिका बजावत आहे असा टोला नागरेकर यांनी लगावला आहे.
शिवसेनेत कशा प्रकारे पैसे देऊन तिकीटे दिली जातात, कशा प्रकारे आपण लोकप्रतिनिधींकडून सोन्याची चेन, पैशाच्या बॅगा स्विकारल्यात हे त्याच लोकप्रतिनिधींनी उघडपणे पत्रकार परिषदा घेऊन सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही टक्केवारीची भाषा करणे म्हणजे चोराच्या उलटया बोंबा असल्याची टिका नागरेकर यांनी केली आहे. सामंत यांनी देखील पैशाबाबत खासदार राऊत यांनी बोलू नये असे सूचक विधान केले आहे, त्यातच काय ते समजा. राहिला आम्हांला पोसण्याचा प्रश्न, आम्हांला कुणी पोसण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी आमचे नेतृत्व सक्षम आहे, भाजपाची शक्ती काय आहे ते दाखवून देण्याची वेळ येईल तेव्हा दाखवून देऊ. तुमच्या सारख्या विदुषकाला आता योग्य वेळी जनताच जागा दाखवेल, असेही नागरेकर यांनी नमूद केले आहे.
अशा प्रकारे मातोश्रीची दलाली करणाऱ्या, लोकप्रतिनिधींकडून पैसे उकळणाऱ्या खासदार राऊत यांनी राणे आणि राणे समर्थकांवर बोलू नये अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा ईशाराही नागरेकर यांनी दिला आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times