शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्यावतीने तिसऱ्या सोमवारचे निमित्त साधून देवीचे जग आणण्याची दरवर्षी प्रथा आहे. सोमवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी देवीच्या जगाची सवाद्य मिरवणूक काढणायात आली. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी म्हणजे कालच मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथीयांनी बघणाऱ्याला लाजवेल अशा पध्दतीने हावभाव करत नृत्य करत हातात सिगारेट पेटवून धूम्रपान करत डीजेच्या रिमिक्स गाण्यावर ठेका धरत मिरवणूक काढली होती. विशेष म्हणजे यावेळी हा सर्व प्रकार शिवशाहूंच्या फोटोसमोर सुरू होता.
हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवशाहूप्रेमींकडून संताप व्यक्त होत असल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गवंडी उपाध्यक्ष राकेश पोवार, सलमान बागवान,नितीन साळी,किरण साटम सर्वजण राहणार शुक्रवार पेठ परिसर यांच्यासह इतर १० अनोळखी इसम आणि ३ ते ४ अनोळखी तृतीयपंथी इसमांविरोधात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टेज उभा करून तसेच ध्वनिक्षेपक लावून मिरवणुका काढणे, तसेच अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके करत आहेत.
काय आहे व्हिडिओ मध्ये?
वायरल व्हिडिओमध्ये डीजेच्या तालावर काही तरुणी चंद्रमुखी या गाण्याच्या रिमिक्सवर सिगारेट ओढत नाचत असल्याचे दिसून येत आहे. तर, यामध्ये काही तृतीयपंथी देखील असल्याचे दिसत आहे. शिवाय डीजेच्या बाजूला पंचगंगा तालीम मंडळ शुक्रवार पेठ असे लिहिले असून या दोन्ही बाजूंना छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे फोटो लावण्यात आले आहेत. नशा करत डीजेच्या तालावर धांगडधिंगा घालत, सिगरेट ओढणे आणि गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि शाहूप्रेमींनी संताप व्यक्त केला असून यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवशाहू प्रेमी कडून केली गेली होती.