मुंबई : राज्य विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पक्षातून बंडखोरी केलेल्या आमदारांवर बोचरी टीका केली आहे. ‘एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रिपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकर्त्याने बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे दिसेल,’ असा इशारा देत शिवसेनेनं हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरूनही शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. पण या महोत्सवात महाराष्ट्राच्या वाट्याला अमृताचे दोन कण सोडाच. पण लाचारी आणि गुलामीच्याच बेड्या पडल्याचे दिसते. शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी देवेंद्र फडणवीस महोदय आहेत हे एकंदरीत जे खातेवाटप वगैरे झाले त्यावरून स्पष्ट दिसते. भाजपने फेकलेल्या तुकड्यांवर व खोक्यांवरच त्यांना यापुढे गुजराण करावी लागेल. खातेवाटपानंतर शिंदे गटात, नाराजीचे भिजलेले फटाके फुटू लागले. म्हणजे आधी हा गट ठाकरे सरकारवर नाराज व आता नव्या व्यवस्थेवर नाराज. शेवटी ‘लेन-देन’ व्यवहारातून एखादे सरकार बनले की दुसरे काय घडायचे?’ असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

मुंबई पोलिसांचा गुजरातच्या कारखान्यात छापा; एक हजार कोटींचे एमडी ड्रग्ज हस्तगत

खातेवाटपात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांना दुय्यम खाती देण्यात आल्याचं बोललं जात आहे. हाच धागा पकडत शिवसेनेनं भाजपलाही फटकारलं आहे. ‘गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वने, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय अशी महत्त्वाची खाती भाजपने खिशात घातली. यात आश्चर्य ते काय? अख्खा शिंदे गटच त्यांनी विकत घेऊन, धाकात ठेवून खिशात घातला तेथे खात्यांचे काय? नगरविकास हे मुख्यमंत्र्यांचे ‘खाते-पिते’ आवडते खाते सोडले तर शिंदे गटाच्या नशिबी दुष्काळच आहे. नगरविकास हे खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. पण उद्धव ठाकरे यांनी ते शिंदे यांना विश्वासाने बहाल केले होते. साधारणतः मुख्यमंत्र्यांकडे सार्वजनिक प्रशासन, विधी व न्याय अशी खाती असतात. न्याय व्यवस्था भाजपने आपल्या मुठीत ठेवली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे खातेवाटपाच्या धक्क्यातून सावरले आहेत काय, ते विधानसभेत दिसेल. या दोघांची अवस्था केविलवाणी झाली आहे,’ अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास, तर गोविंदांना विमा कवच; मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनात अनेक चेहरे उघडे पडतील व मुखवटे गळून पडतील. चेहऱ्यांवर खोटे हसू आणून या दुःखी लोकांना समोर यावे लागेल. विधानसभेत अजितदादा पवार व विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते पदावर विराजमान झाले आहेत व ते या गटातटाच्या सरकारची कोंबडी सोलून काढतील, असा विश्वासही शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here