मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर सरकारला अवघ्या दोन दिवसांत मंत्र्यांना अधिवेशनाला सामोरे जावे लागत आहे. या कालावधीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या फायलींचे ढिगारे प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात दिसत आहेत. सर्वाधिक फायली मुख्यमंत्री कार्यालयात आहेत. मुख्यमंत्री सातत्याने दौरे करीत असल्याने या प्रश्नांवर उत्तरे तयार करताना मुख्यमंत्री कार्यालयाची तारांबळ उडाली आहे. मंत्रीमंडळात सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यासारखे मंत्री नवखे आहेत. त्यातच मंत्र्यांना फायली वाचण्याएवढाही वेळ नसताना या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून माहिती मागवून मग त्यावर समर्पक उत्तरे देणे फारच कठीण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष सभागृहात काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अधिवेशनापूर्वीच शिवसेना आक्रमक
पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेचे मुखपत्र असलेला दैनिक ‘सामना’ आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रिपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकर्त्याने बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे दिसेल,’ अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
अजित पवार-भाजप जुगलबंदी रंगणार की राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर?
राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आली आहे. याआधी सरकारच्या बहुमत चाचणीदरम्यान अजित पवार यांनी नवे सरकार नेमके कसे अस्तित्वात आले, कोणी कोणी कसे सुरत गाठले यावर मोजक्या पण मिश्किल शब्दांत भाष्य करीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता अधिवेशनाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपचे मंत्री अशी पुन्हा एकदा जुगलबंदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, अधिवेशनाच्या आदल्या रात्रीच मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अधिवेशनात सरकारवर तुटून पडणार का बॅकफूटवर जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.