kolhapur crime news today, कोल्हापुरात टोळक्याचा धुडगूस: घरात घुसून साहित्य पेटवले; महिलेला शिवीगाळ करत मारहाण – seven to eight accused set a house on fire and beat up a woman in karveer taluka
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून कोल्हापुरात टोळक्याने एका कुटुंबाच्या घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, कॅमेरा, डीव्हीआर, मोबाईल आणि इतर साहित्य जाळत धुडगूस घातल्याची घटना घडली आहे. यावेळी टोळक्याकडून कुटुंबातील महिलेला मारहाण करत शिवीगाळही करण्यात आली. ही घटना करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक यांच्यासह अन्य पोलीस पथक दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणी आता करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी फुलेवाडी रिंगरोड येथील एका कार्यक्रमावरून लक्षतीर्थ वसाहत येथे राहणाऱ्या संतोष बोडके याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचा राग मनात धरून बोडके यांच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडी रिंगरोड येथे राहणारे विजय उर्फ रिंकू देसाई आणि शिंगाणापूर येथे राहणारे नितीन वरेकर यांच्या घरावर हल्ला करत आलिशान कार जाळली होती. १५ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा एकदा बोडके यांच्या कार्यकर्त्यांनी वरेकर यांच्या घरावर हल्ला करत घर जाळण्याचा प्रयत्न केला. पुण्यात भीषण अपघात; पाच जणांचा जागेवर मृत्यू , तीन लहान मुलांचा समावेश
रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान सुमारे सात ते आठ अज्ञात तरुण याठिकाणी शिवीगाळ करत घरात घुसले. त्यानंतर घराच्या बेडरूममध्ये जाऊन कपडे, प्रापंचिक साहित्य गोळा करत पेटवून दिले. तसेच घरातील एका महिलेला देखील मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षकांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. काल मंगळवारी दिवसभर या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सर्व प्रकारची माहिती घेत पोलिसांकडून संशयित राजू बोडके (रा. लक्षतीर्थ वसाहत), उमेश कोळपाटे, विश्वजित फाले (बोंद्रेनगर, रिंग रोड) यांच्यासह सात जणांविरुद्ध करवीर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातील वस्तूंची तोडफोड
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितीन वरेकर हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे, तर त्याचे कुटुंब शिंगणापूर येथे राहते. बोडके यांच्या कार्यकर्त्यांनी मागील वेळी घरात घुसून आलिशान कारची जाळपोळ करत घरातील सर्व साहित्याची तोडफोड केली होती. तर अनेक वेळा घरात येऊन घरातील महिलांना जीवे मारण्याची धमकी त्यांच्या कार्यकर्त्याकडून दिली जात असल्याची तक्रार फिर्यादींनी पोलिसांकडे दिली आहे.