सांगली : जमीन दाखवण्याच्या बहाण्याने सांगली शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. माणिकराव विठ्ठल पाटील (वय ५४) असं अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. तुंग येथून पाटील यांच्या गाडीसह त्यांचे अपहरण करण्यात आले असून याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार माणिकराव पाटील हे शहरातील राम मंदिर येथील इंद्रनील प्लाझा, सिव्हिल हॉस्पिटल रोड या ठिकाणी वास्तव्यास आहेत. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने पाटील यांना तुंग याठिकाणी बोलावून घेण्यात आले होते. तेथून पाटील हे गायब झाले आहेत. १३ ऑगस्ट रोजी माणिकराव पाटील हे आपल्या गाडीसह घरातून बाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही. त्यानंतर पाटील कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने माणिकराव पाटील यांचा मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन वडील गायब असल्याची फिर्याद दाखल केली.

Mohit Kamboj: अपना १००% स्ट्राईक रेट है! अब तांडव होगा; मोहित कंबोज यांचं आणखी एक सनसनाटी ट्विट

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता तुंग येथून गाडी बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले. पोलिसांनी अधिक तपास केला असता गाडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरच्या दिशेने गेल्याच्या समोर आलं. त्यानंतर जयसिंगपूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जयसिंगपूरमधून ही गाडी बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळालं. अखेर कोडिग्रीजवळ बेवारस स्थितीमध्ये माणिक पाटील यांची गाडी आढळून आली आहे.

माणिक पाटील यांच्या अपहरणाचे गूढ वाढले असून अद्याप त्यांचा शोध लागेलला नाही. पाटील हे मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्याचबरोबर ते शासकीय कामांचे मोठे कंत्राटदारही आहेत. त्यामुळे हे अपहरण नेमकं कोणी आणि कोणत्या कारणातून करण्यात केलं आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here