प्रवीण दरेकर यांनी बुधवारी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी प्रवीण दरेकर यांना मोहित कंबोज यांच्या ट्विटविषयी विचारणा झाली. त्यावर दरेकर यांनी म्हटले की, एखाद्या नागरिकाने ट्विट केलं तर एवढं गदारोळ करण्याचे कारण नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेही सोशल मीडियावर आमच्यावर विखारी आणि कुत्सित टीका करतात. तेव्हा आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपतो आणि काही बोलत नाही. त्यामुळे आता मोहित कंबोज यांचं ट्विटही कोणाला झोंबण्याच कारण नाही. आपण निष्कलंक असू, आपला दोष नसेल तर अशाप्रकारचं ट्विट गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. लोकशाही प्रत्येकाला चौकशीची मागणी करण्याचा अधिकार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
त्यावर सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरु करणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. तेव्हा दरेकर यांनी म्हटले की, गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या, बंद करण्यात आलेल्या केस पुन्हा ओपन करून तपास करण्यात आला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीही मागणी होईल. एखादा विषय प्रसारमाध्यमांतून चव्हाट्यावर आला, कोणी शंका उपस्थित केली असेल तर त्याला न्याय देणे, संबंधित विषय धसास लावणे, ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याच जबाबदारीच्या भावनेतून आम्ही सिंचन घोटाळ्याच्या विषयाला हात घालू. सिंचन घोटाळ्याची चौकशी हो कोणा एका व्यक्तीविरोधात नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे, असे दरेकर यांनी म्हटले. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?
मोहित कंबोज यांनी कालपासून पुन्हा एकदा ट्विटसची मालिका सुरु केली आहे. या माध्यमातून मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. कंबोज हे लवकरच पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार आहेत. मात्र, त्यापूर्वी मोहित कंबोज सोशल मीडियावर जोरदार वातावरणनिर्मिती करताना दिसत आहेत. ट्विटमध्ये कंबोज यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांची नावं लिहली आहेत. त्यानंतर कंबोज यांनी पाचवी जागा रिक्त सोडली आहे. याठिकाणी लवकरच एका नेत्याचा नंबर लागेल, असे संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.