मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘बेईमानी लोकांचं हे लोकशाहीच्या विरोधी सरकार आहे आणि असं सरकार लवकरच कोसळेल,’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
‘जे मंत्रिमंडळ आणि खातेवाटप झालं आहे, त्यातून खरा मुख्यमंत्री कोण, हे आता सगळ्यांना कळालं आहे. जे अपक्ष त्यांच्यासोबत गेले होते, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. भाजपमध्ये चांगलं काम करणाऱ्या महिलांचाही मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. खरंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे जे निष्ठावंत बंड करण्यासाठी सगळ्यात आधी गेले होते, त्यांनाच बाजूला ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात निष्ठेला कोणतंच स्थान नाही, हे स्पष्ट झालं आहे,’ असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. NCP Leader : ‘… आम्ही बैल नांगरसकट लावतो’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोहित कंबोजांना इशारा
बंडखोर आमदार संपर्कात?
खातेवाटपावरून नाराज झालेले बंडखोर आमदार तुमच्या संपर्कात आहेत का, या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘संपर्क सतत सुरू असतो. तिकडे गेलेले आमदार अडकले आहेत, फसले आहेत. फसल्यानंतर त्यांच्या मनात असेल की आपल्याला आता मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत की नाही. ज्यांना परत यायचंय त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, हे मी सगळ्यांना सांगतोय आणि ज्या गद्दारांना तिकडेच राहायचं आहे त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, खातेवाटबाबत असंतुष्ट असलेल्या मंत्र्यांची नाराजी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच त्यांच्यावर अतिरिक्त खात्यांची जबाबदारीही सोपवली आहे. त्यामुळे या मंत्र्यांची नाराजी दूर होते का, हे पाहावं लागेल.