मुंबई : अधिवेशनाच्या आदल्या रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करुन राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही दिवसांसाठी दिशाच बदलून टाकली. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा करताना मोहित कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. काल रात्री त्यांनी ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झालाय. दुसरीकडे अधिवेशन काळात असे आरोप करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यातं हे कारस्थान आहे, असं म्हणत विरोधी पक्षही जोरदार आक्रमक झालाय. पण त्याचवेळी ,”मोहित कंबोज यांच्या ट्विटचा अर्थ खोल आहे. त्यांच्याजवळ पुरावे असतील म्हणूनच त्यांनी ट्विट केलं असेल. त्यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. तो नेता कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्या नेत्याची सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्यासंबंधीची पावलं उचलली जातील”, असं भाजपच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजितदादांची ती फाईल पुन्हा ओपन करणार असल्याचं सूतोवाच केलंय.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरु झाले. आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अजित पवार यांच्यावर झाले होते. मात्र, २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सिंचन घोटाळ्याची केस बंद केली होती. मात्र, मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर आता ही केस पुन्हा ओपन होण्याची दाट शक्यता आहे.

मोहित कंबोजांच्या ट्विटनंतर हालचालींना वेग, ‘ती’ केस पुन्हा ओपन होणार, भाजपकडून अजितदादांना घेरण्याची तयारी?
“मी सरकारचा भाग नाही, सत्तापक्षाचा सदस्य आहे. मी अजितदादांच्या त्या केसविषयी आणि कारवाईच्या संकेताविषयी बोलणार नाही. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सरकार माहिती देईल. पण मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे, हे खरंय.. त्यांच्याकडे पुरावे असतील… ते नक्की पुरावे सादर करतील… एखाद्याकडे माहिती असेल तर तो ट्विट करु शकतो, दावे करु शकतो, लोकशाहीत तसा प्रत्येकाला अधिकार आहे”, असं सांगत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी कंबोज यांची पाठराखण केली.

प्रवीण दरेकर यांनी बुधवारी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी प्रवीण दरेकर यांना मोहित कंबोज यांच्या ट्विटविषयी विचारणा झाली. त्यावर दरेकर यांनी म्हटले की, एखाद्या नागरिकाने ट्विट केलं तर एवढं गदारोळ करण्याचे कारण नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेही सोशल मीडियावर आमच्यावर विखारी आणि कुत्सित टीका करतात. तेव्हा आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपतो आणि काही बोलत नाही. त्यामुळे आता मोहित कंबोज यांचं ट्विटही कोणाला झोंबण्याच कारण नाही. आपण निष्कलंक असू, आपला दोष नसेल तर अशाप्रकारचं ट्विट गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. लोकशाही प्रत्येकाला चौकशीची मागणी करण्याचा अधिकार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

NCP Leader : ‘… आम्ही बैल नांगरसकट लावतो’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोहित कंबोजांना इशारा
त्यावर सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरु करणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. तेव्हा दरेकर यांनी म्हटले की, गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या, बंद करण्यात आलेल्या केस पुन्हा ओपन करून तपास करण्यात आला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीही मागणी होईल. एखादा विषय प्रसारमाध्यमांतून चव्हाट्यावर आला, कोणी शंका उपस्थित केली असेल तर त्याला न्याय देणे, संबंधित विषय धसास लावणे, ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याच जबाबदारीच्या भावनेतून आम्ही सिंचन घोटाळ्याच्या विषयाला हात घालू. सिंचन घोटाळ्याची चौकशी हो कोणा एका व्यक्तीविरोधात नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे, असे दरेकर यांनी म्हटले. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गिरीश महाजन यांनीही याच अनुषंगाने वक्तव्य केलं.

एकंदरितच मोहित कंबोज यांच्या ट्विटचा अर्थ आणि भाजप नेत्यांनी कंबोज यांची केलेली पाठराखण यावरुन अजितदादांची कथित सिंचन घोटाळ्याची ती फाईल पुन्हा रिओपन होणार, याचेच संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here