वाशिम : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे अंत्ययात्रेत सहभागी नातेवाईकांनी चक्क पार्थिव खाली ठेवून राष्ट्रगीत गात राष्ट्रगीताचा सन्मान केला आहे.
बाहेती परिवाराच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उत्साह
आज मंत्रालयासह राज्यभरात सर्वच ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन झालं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. तसंच रा.प महामंडळाच्या मुख्यालयासह राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे, बसस्थानके तसेच वर्कशॉप येथेही ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उत्साहात पार पडले.