दोघांमध्ये पैशाच्या कारणातून वाद
आरोपी महेश मसराम याचे बायपास रस्त्यावर असलेल्या कारला चौकात एस.एम. बिर्याणी नावाचं हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये मृतक अमोल मसराम हा काम करत होता. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पैशाच्या कारणातून वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी महेश मसराम याने अमोलला जीवे मारण्याचा कट रचला. रात्रीच्या सुमारास आरोपी महेश हॉटेलमध्ये गेला. तिथे त्याने मद्य प्राशन केले आणि मृतक अमोललाही दारु पाजली. त्यानंतर आरोपी महेश याने मृतक अमोलला दुचाकीवर बसवून बायपास रस्त्याने पिपरी मेघे येथील जुना पाणी परिसरातून जाणाऱ्या उड्डणपुलावर नेले. तेथे पुन्हा आरोपी महेश याने मृतकाशी वाद करुन जवळील चाकूने त्याच्या गळ्यावर पाठीवर तसेच हातापायावर सुमारे दहा ते बारावेळा सपासप वार करुन तेथून निघून गेला. अमोलचा मृतदेह उड्डणपुलावरच रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहिला.
पहाटेच्या सुमारास नागरिकांना मृतदेह दिसला
पहाटेच्या सुमारास नागरिकांना मृतदेह दिसून येताच त्यांनी तत्काळ रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. दरम्यान मृतकाच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. आरोपी महेशसोबत आणखी एक व्यक्ती असल्याचा संशय रामनगर पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
आरोपीविरोधात दारुचे तसेच आर्म्स ऍक्ट क अंतर्गत गुन्हे दाखल
आरोपी महेश याच्याविरुद्ध यापूर्वीही दारुचे तसेच आर्म्स ऍक्ट क अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी आरोपी महेशने एका ऑनलाईन साईटवरुन चायनीज चाकू ऑर्डर केला होता. त्याच चाकूने महेशने अमोलची हत्या केल्याची माहिती आहे. ज्या दुचाकीवर बसवून मृतकाला बायपास रस्त्याने आरोपी महेश घेऊन गेला होता. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच आरोपीचे रक्ताने माखलेले कपडेही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चाकूही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.