देवेंद्र फडणवीस यांचा समावेश केंद्रीय निवडणूक समितीत करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक समितीला तिकीट वाटपाचे अधिकार असताता. त्यामुळे या समितीत फडणवीसांचा समावेश होणं अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा या समितीचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल यांच्यासह एकूण १५ जणांचा समितीत समावेश आहे.
भाजपच्या संसदीय समितीची पुनर्रचना; गडकरी, चौहान यांना डच्चू
भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकही नेता नाही. या समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या नावाचा समावेश निवडणूक समितीत करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं संसदीय समितीची घोषणा केली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोन्ही वरिष्ठ नेते आधी या समितीमध्ये होते. मात्र आता त्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यांच्या जागी आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.