– एनडीआरएफ, तटरक्षक दल किनारपट्टीवर सज्ज
– जिल्ह्यात संचारबंदी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तहसीलदारांचे आवाहन
किनारपट्टीवरील वसाहतींमधील कुटुंबांनी स्वत:ची व कुंटुंबाची काळजी घ्या.समुद्रकिनारी जाऊ नका.घराबाहेर पडून नका.दक्ष रहा व दक्षता घ्या, असे आवाहन तालुक्यांमधील तहसीलदारांनी नागरिकांना केले आहे.
म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून आज, बुधवारी जिल्ह्यात दिवसभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आव्हान जिल्हा प्रशासनाने मंगळवारी केले. तसेच समुद्रात मच्छिमारीला गेलेल्या बोटी माघारी बोलवण्यात आल्या असल्या, तरी अनेक बोटी परतलेल्या नसल्याने तटरक्षक दल त्यांच्या संपर्कात आहे.
मच्छिमार व हौशींनी समुद्रामध्ये मच्छिमारीसाठी जाऊ नये, आपले घर सुरक्षित असल्यास तसेच अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यासच घरात राहा, घराच्या बाहेर पडू नका, तुमचे घर मोडकळीस आलेल्या स्थितीत असेल अथवा कच्च्या स्वरूपाचे बांधकाम असेल, तर स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी स्थलांतर रेषा आखून दिली आहे, अशा पूरस्थिती उद्भवणाऱ्या खाडीपट्ट्यातील वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तटरक्षक दल व सीमाशुल्क तसेच मत्स्यखात्याच्या अधिकाऱ्यांना पोलिसांसह निगराणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत लक्षात घेऊन पशूधन व पाळीव प्राणी यांना आगोदरच सुरक्षितस्थळी हलवण्याचा प्रयत्न प्रशासनाने अवलंबला आहे. लोकांनी दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी जवळ बाळगण्याबरोबर रेडिओ बाळगावा, असे आवाहन केले आहे. मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये, म्हणून किनाऱ्यावर त्या सुरक्षित बांधून ठेवण्याच्या व अन्य उपाययोजना करण्यास सांगून ग्रामकृती दलांच्या सूचनांचे पालन करावे, असे म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या ३०० पार झाली असून, गृहविलगीकरणात असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षितस्थळी पाठवताना ते एकमेकांत मिसळले जाणार नाही, याची दक्षता घेऊनच यंत्रणा राबवत असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.
तटरक्षक दलाच्या बोटी सज्ज
जिल्ह्यात तटरक्षक दलाच्या बोटी सज्ज झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मिरकरवाडा बंदरात तटरक्षकांच्या बोटी तैनात करण्यात आल्या असून, त्या निगराणीवर आहेत. समुद्रात मच्छिमारीला गेलेल्या बोटी परत बोलवण्यात आल्या असल्या, तरी अनेक बोटी परतलेल्या नसल्याने त्यांच्या संपर्कात व मागावर तटरक्षक दल सज्ज आहे. एनडीआरएफचे पथक पोहचले असून, ते तैनात झाले आहे. या पथकाने मंगळवारी किनारपट्टीची पाहणी करून विशेष काळजी घेण्याबाबत स्थानिकांशी चर्चा करून मार्गदर्शनही केले. तसेच ग्रामदलांनाही सूचना केल्या.
बाजारपेठा आज बंद
जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, रत्नागिरी आदी सर्वच तालुक्यांतील बाजारपेठा आज, बुधवारी बंद राहणार असून, जिल्हा व्यापारी संघाने बंदचे आव्हान करताना कोणीही विनाकारण बाहेर पडू नये व सर्तक राहावे, असे आवाहन केले आहे. तालुक्यातील किनारपट्टीवर सर्व ग्रामपंचायती, तटरक्षक दल पदाधिकारी व समाजसेवक यांच्या सहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines