उलुबेरिया नगरपालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, मृत भ्रूण सापडलेल्या कचराकुंडीच्या दीड किलोमीटरच्या परिसरात ३० खासगी नर्सिंग होम आहेत. मृत भ्रूणांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नर्सिंग होम्सनी वैद्यकीय कचरा म्हणून भ्रूण फेकली का, याचा शोध घेतला जात आहे.
मोठ्या प्रमाणात मृत भ्रूण आढळून आल्यानं स्थानिक संतप्त झाले आहेत. यामध्ये खासगी नर्सिंग होमचा हात असून नगरपालिकेचे अधिकारी यांचादेखील यामध्ये समावेश असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. घटनास्थळी पोहोचलेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी घेराव घातला. याआधीही असे प्रकार घडले आहेत. त्याबद्दल तक्रारीदेखील करण्यात आल्या. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं स्थानिकांनी सांगितलं.
अशा प्रकारच्या घटना कोणत्याही घटना नर्सिंग होमकडून केल्या जात नसल्याचं उलुबेरिया नगरपालिकेचे उपसंचालक इनामूर रहमान यांनी सांगितलं. भ्रूण दुसऱ्या ठिकाणांहून आणून या ठिकाणी फेकण्यात आली असावीत, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती तयार करण्यात आली असून त्या समितीची बैठक सोमवारी होईल, असं रहमान यांनी सांगितलं.