महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. सत्तेत येताच आमदारांची दादागिरीची वक्तव्ये, अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न झालेली मदत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. सभागृहात पहिल्या दिवशी फारशी खडाजंगी झालेली नसली तरी सभागृहाबाहेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तसेच त्यांच्या गटातील आमदारांचं विधिमंडळ परिसरात आगमन झालं. याचवेळी विरोधकांनी विधिमंडळ परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. शिंदे गटातील आमदारांना पाहताच विरोधकांच्या गर्दी उभे असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासहित बाकी आमदारांनी “आले रे आले गद्दार आले…” अशा घोषणा दिल्या. यावेळी ५० खोके.. सगळं ओके…. अशा घोषणाही दिल्या गेल्या.
विरोधकांची हीच घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागली. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांशी खाजगीत बोलताना विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याची सूचना केली. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपलं सरकार कसं चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा, असे आदेश देतानाच आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे. एखादी गोष्ट समाजावून सांगताना ती लोकशाही मूल्ये आणि संविधानिक भाषेत समजावून सांगावी. आपल्याकडून कोणतंही चुकीचं वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.