जालन्यातील कानैयानगर भागातील नवीन मोंढ्यातील ड्राय फ्रूट, सुका मेवाच्या २ ते ३ दुकानांवर १२ ते १३ वाहनांमधून आलेल्या पथकाने धाडी टाकल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणावरून या धाडी टाकल्या आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, आज दुपार सुमारास आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी नवीन मोंढा भागातील सुका मेवा विक्री करणाऱ्या २ ते ३ दुकानांची अचानक झाडाझडती घेतली.
झाडाझडती घेणारे अधिकारी हे GST विभागाच्या पथकातील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही .या अधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये जाऊन झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे. दुकानांचे शटर ओढून घेत आतमध्ये तपासण्या सुरू असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने स्टील कंपनीवर कारवाई करत तब्बल ३९० कोटी जप्त केले होते. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून यामुळे अजय देवगनचा ‘रेड’ चित्रपट आठवतो. तब्बल आठ दिवस ही छापेमारी सुरू होती. सकाळी ११ वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत नोटा मोजण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे नोटा मोजता मोजता चक्क अधिकारी आजारी पडले. पण नोटा काही संपता संपत नव्हत्या. असाच काहीसा प्रकार आज जालन्यात घडला असल्याचं चित्र आहे.