पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवरून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच मेटे यांच्या दुसऱ्या चालकाने मेटे यांच्या मृत्यूआधी ३ ऑगस्टच्या रात्री मेटे यांच्या कारचा पाठलाग झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे मेटे यांच्या मृत्यूचे गूढ वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

शिक्रापूरदरम्यान मेटे यांच्या कारचा पाठलाग करणारी कार रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये ड्रायव्हरबरोबर सहा जण असल्याची माहिती समोर आली आहे. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं.
Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताची CID चौकशी, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे. तसेच गाडीचे मालक आणि चालक असलेले संदीप विर याला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. कारमधील ६ जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्याने ते शिरूरला गेले होते. त्यांचे नातेवाईकदेखील शिरूरमध्ये आले होते, अशी माहिती चौकशीमधून समोर आली आहे. ३ ऑगस्ट रोजी मेटे यांच्या कारचा पाठलाग करण्यात आला होता.

या संदर्भात संवाद साधतानाची क्लिप व्हायरल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली असून ती पाठलाग करणारी कार ताब्यात घेण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या मृत्यूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेटे यांच्या पत्नीनेदेखील याबाबत शंका व्यक्त केली होती. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here