मुंबई : अधिवेशनाच्या आदल्या रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करुन राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही दिवसांसाठी दिशाच बदलून टाकली. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा करताना मोहित कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. काल रात्री त्यांनी ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी रोहित पवार यांनी ‘दादा’ स्टाईल रोखठोक प्रतिक्रिया देत कंबोज यांचा आतापर्यंतचा इतिहासच सांगितला.

“ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना…” असं म्हणत शालजोडीतून त्यांनी पहिला टोला लगावला. तसेच मोहित कंबोज यांना मी आतापर्यंत कधी भेटलो नाही, असं सांगतानाच वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव ऐकलंय. पण प्रसिद्धी माध्यमांमध्ये येण्यासाठी ते फारच धडपड करतात, असं म्हणत त्यांची खिल्लीही उडवली.

“आतापर्यंत किरीट सोमय्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करायचे, पत्रकार परिषदा घ्यायचे, ट्विट करायचे… त्यानंतर किरीट सोमय्यांना मीडियाचं कव्हरेज मिळायचं. त्याच पद्धतीचं कव्हरेज आपल्याला मिळावं म्हणून कंबोज अशा पद्धतीचे ट्विट करीत असावेत”, असंही रोहित पवार म्हणाले.

मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का?
भाजप नेते मोहित कंबोज यांची पाठराखण करत आहेत, असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “भाजपमधीलच एखादा नेता त्यांची पाठराखण करण्यासाठी पुढे येतो.कारण दुसरी कुठलीही संधी नसते. साहजिक शेलारांनी त्यांची पाठराखण केली असावी. पण असे ट्विट करुन किंवा आरोप करुन लोकांचे मत विचलित करण्याचा प्रयत्न असे लोक करत आहेत”, असा निशाणा रोहित पवारांनी साधला.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या पाठिशी, ३ बडे नेते म्हणतात, ‘अजितदादांविषयी ते प्लॅनिंग ठरलंय!’
मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या?

मलिक-देशमुख-राऊतांबरोबर राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता तुरुंगात जाणार, असा दावा करताना कंबोज यांचा रोख अजित पवार यांच्याकडे होता. सिंचन घोटाळ्याची ‘ती’ फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं. त्यांच्या ट्विटनंतर अधिवेशनाच्या चर्चेची दिशाच पार बदलून गेली. परंतु यानिमित्ताने मोहित कंबोज यांची जोरदार चर्चा सुरु आहे. ते महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का? अशी चर्चा प्रामुख्याने सोशल मीडियावर सुरु आहे.

भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर किरीट सोमय्या फारसे सक्रिय नसतात. पण भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात काम करतो तेव्हा तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर किरीट सोमय्या आरोपांची राळ उडवतात. एकेक नेता पकडून त्यांच्यावर भलेमोठे आरोप लावतात. कागदपत्रे असल्याचा दावा करतात. संबंधित यंत्रणेकडे चौकशीची मागणी करतात. महाराष्ट्राला सोमय्यांचा अशा पद्धतीचा परिचय आहे. आता भाजपमधले मोहित कंबोज देखील सोमय्यांच्याच वाटेवर आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here