शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा स्वराज्याची राजधानी रायगड येथे पार पडला. स्वराज्याच्या राजधानीला लागलेलं गद्दारीचं ग्रहण दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे रायगडात दाखल झाल्याचं माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते महाड मध्ये झालेल्या सभेत म्हणाले. तेव्हा आमच्या सोबत राहणार का ?, अशी भावनिक साद घालताच महाडकरांनी हात वर करून आदित्य ठाकरे यांना कौल दिला. महाड येथे भर पावसात आदित्य ठाकरे यांच्या झालेल्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत महाडकरांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी आपण नसल्याचं दाखवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, महाड येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बंडखोरांवर तुफान बरसले. ऐवढी वर्षे ज्यांना संभाळलं, सर्व काही दिलं, तरी यांनी पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही गेलात तिथे आनंदीत रहा, आमच्या मनात राग द्वेष नाही. लोकांनी या पूर्वीही अशा उड्या टाकलेल्या आहे. पण तुमच्यात थोडी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिलं.
महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण आम्ही केले. कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक जगभरात होत होतं. कोविड काळात सहा लाख कोटींची गुंतवणूक आपण केली. हा विकास होत असताना कुठेही जातीय दंगली झाल्या नाहीत. प्रत्येक धर्माला सोबत घेऊन आपण जात होतो. हिंदु-मुस्लिम भेदभाव केला नाही. हेच यांच्या पोटात दुखत होतं. उद्धवजी कोणासमोर झुकले नाहीत. राजकीय नेत्यांना मणका असतो, ते उद्धव ठाकरेंकडे पाहून कळालं. नाहीतर दिल्ली दरबारी अनेक जण सध्या झुकत आहेत, असं आदित्य ठाकरे भाषणात म्हणाले.
राजकीय षडयंत्री राज्यपाल पहिल्यांदाच पाहिला- आदित्य ठाकरे
पाच ते सहा राज्यपाल आम्ही पाहिलेत. अनेक प्रश्न आम्ही त्यांच्याकडे नेले, पण असे राजकिय षडयंत्री राज्यपाल आम्ही पहिल्यांदाच पाहिले. हे राज्यपाल सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, त्यानंतर मराठी-अमराठी असे वादग्रस्त पहिल्यांदाच बोललेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांवर टीका केली.