uddhav thackeray vs narendra modi, हे धंदे बंद करा आणि लाज बाळगा; शिवसेनेनं थेट नाव घेत नरेंद्र मोदींवर चढवला घणाघाती हल्ला – shivsena saamana editorial uddhav thackeray criticizes pm narendra modi over red fort speech
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदार आणि खासदारांचा गट भलेही भाजपसोबत गेला असेल, मात्र शिवसेना नेतृत्वाचा भाजपविरोधातील टीकेचा स्वर अद्यापही क्षीण झाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा शिवसेनेकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. ‘एकीकडे अग्निवीर अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा. उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे. हे धंदे बंद करा. बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा. जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे,’ अशा शब्दांत शिवसेना नेतृत्वाने सामना या पक्षाच्या मुखपत्रातून आपला संताप व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने आणलेली अग्निवीर योजना आणि त्या अनुषंगाने उपस्थितीत होत असलेल्या प्रश्नांबाबत शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘आझादीच्या अमृत महोत्सवाचा राजकीय उत्सव संपला असेल तर सरकारने देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बरेच काही बोलून गेले. त्यांचे भाषण राजकीय प्रचारकी थाटाचे होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी त्यांनी लाल किल्ल्यावरून केली. पंतप्रधानांचे भाषण संपले आणि इकडे महाराष्ट्रात ‘अग्निवीर’ योजनेची पोलखोल झाली. संभाजीनगरात अग्निवीर भरतीसाठी हजारो बेरोजगार तरुण आले. त्यांना दिवस-रात्र अन्न-पाण्याशिवाय तळमळत रस्त्यावरच राहावे लागले. ‘अग्निवीर’ हे आपल्या देशाचे भाग्यविधाते, राष्ट्रसेवक वगैरे असल्याचे पंतप्रधानांकडून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात अग्निवीरांची अवस्था भिकाऱ्याहून भिकाऱ्यासारखी केल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळाले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंच्या मर्जीतील अधिकाऱ्याची दुसऱ्यांदा बदली
भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा
शिवसेनेकडून गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना आता पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे शिवसेनेनं आरएसएसलाही टोला लगावला आहे. ‘पंतप्रधानांपासून भाजपच्या आजच्या पिढीपर्यंत एकही जण स्वातंत्र्य आंदोलनात नव्हता. हे सत्य पंतप्रधान मोदी यांनीच लाल किल्ल्यावरून मान्य केले. स्वातंत्र्यानंतर जन्मास आलेला मी पंतप्रधान असल्याचे ते म्हणतात. मग तुम्ही स्वातंत्र्याचा इतिहास का बदलत आहात? भारतीय जनता पक्षाला हा अधिकार दिला कोणी? ‘घर घर तिरंगा’ वगैरे राजकीय मोहिमा ठीक आहेत, पण देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या कार्यालयांवर व घरांवर तिरंगा फडकविण्यास नकार देणारे आज ‘घर घर तिरंग्या’च्या मोहिमा राबवताना दिसले. हे आश्चर्यच नाही काय?’ असा खोचक सवाल शिवसेनेनं विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, कोणत्या घराणेशाहीची बात आपण करता? ठाकऱ्यांच्या घराणेशाहीवर कालपर्यंत तुमच्या सत्तेचा डोलारा उभा होता. ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगन मोहन रेड्डी आणि कालपर्यंत बिहारचे पासवान, अशा अनेक घराणेशाह्यांनी तुमच्या सत्तेच्या तंबूस टेकू दिले व तुम्ही घेतले, पण सध्याच्या केंद्र सरकारला विस्मृतीचा झटका आला आहे. अगदी महाराष्ट्रात विखे-पाटलांची घराणेशाही सध्या महसुलाची आमसुले चोखत बसली आहेच. बाकी यादी द्यायचीच तर ती लांबतच जाईल व तुमचेच पंचप्राण कंठाशी येतील. मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, इंदिरा गांधी अशी स्वातंत्र्यसमरातील घराणेशाही तुमच्याकडे असेल तर दाखवा. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अशी महाराष्ट्र स्वाभिमानाची तरी घराणेशाही तुम्ही दाखवू शकता काय?’ असं म्हणत ‘सामना’तून नरेंद्र मोदींवर पलटवार करण्यात आला आहे.