मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच सत्तेच्या राजकारणात उतरली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले खरे, मात्र शिवसेनेतच झालेल्या बंडखोरीमुळे उद्धव यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्या हातातून केवळ सत्ता नव्हे तर पक्षही निसटणार की काय, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करताना दुसऱ्या पक्षात न जाता शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय अस्तित्व संकटात आलेलं असताना उद्धव यांचे पुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले असून महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते पक्षाच्या निष्ठावान सैनिकांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या याच शिवसंवाद यात्रेतील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा काही दिवसांपूर्वी कोकणात पोहोचली होती. यावेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि पक्षाचे नेते आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आदित्य ठाकरे यांच्या या भाषणाला उपस्थित शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. मात्र या भाषणावेळी आणखी एका गोष्टीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ज्या चौकात आदित्य ठाकरे यांची सभा सुरू होती, तिथं भाजपचंही कार्यालय होतं. याच भाजप कार्यालयातून काही लोक आदित्य ठाकरे यांचे फोटो काढत होते. ही बाब आदित्य यांच्या लक्षात येताच त्यांनीही फोटो काढणाऱ्या लोकांकडे पाहून स्मितहास्य केलं.

गाडी टोलनाक्यावरून गेली तेव्हा त्यामध्ये विनायक मेटे नव्हतेच; भाच्याचा खळबळजनक दावा

दुसरीकडे, शिवसैनिकांचं लक्ष भाजप कार्यालयाकडे जाताच त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप कार्यालयातही आदित्य ठाकरे यांचे चाहते उपस्थित होते की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here