अजित पवारांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासात माहिती मिळेल असं कळवल्यानंतर अर्ध्या तासात माहिती देण्याचं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं. परंतु अर्ध्या तासात माहिती मिळणं शक्य दिसत नाही, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी माहिती द्या असं कळवलं आहे.
‘फेमस’वरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खडाजंगी
बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपातामुळे झालेला मृत्यू या प्रश्नावर उत्तर देताना सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं, पण फेमस म्हणजे लोकप्रिय या शब्दावर ठाकरे गटातले आमदार सुनिल प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर सावंतांच्या मदतीला मंत्री शंभूराज देसाईही उठले. मात्र अजित पवार यांनी यात हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली. या सूचनेचा विचार केला जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं आहे.