बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल्स, २२५ काडतुसं आढळून आली आहेत. शस्त्रं आढळून आलेल्या बॉक्सवर नेपच्यून मॅरिटाईम सिक्युरिटीचं स्टिकर आहे. नेपच्यून मॅरिटाईम सागरी सुरक्षेशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २००९ मध्ये झालेली आहे.
ओमान ते हरिहरेश्वर हे अंतर ९८५ नॉटिकल मैल इतकं आहे. या बोटीत २ इंडोनेशीयन प्रवासी होते. मात्र ज्यावेळी हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर बोट सापडली, त्यावेळी बोटीत कोणीही नव्हतं. त्यामुळे दोन इंडोनेशियन प्रवासी कुठे गेले असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटीत आढळून आलेली शस्त्रास्त्रं नेमकी कोणाची हा प्रश्नदेखील अद्याप अनुत्तरित आहे.
सुरक्षेचा प्रश्न, चौकशी व्हावी; तटकरेंची मागणी
रायगडच्या किनाऱ्यावर अशा प्रकारे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण घटनेची तपास यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी केली आहे. १९९३ मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर पुढे काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे या बोटीचा तपास व्हायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारनं यंत्रणांच्या माध्यमातून याचा तपास करायला हवा, असं तटकरे म्हणाले.