Shrivardhan Boat: रायगडमधल्या श्रीवर्धन आणि भरडखोलमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या आहेत. या दोन बोटी आढळल्यानंतर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बोटीमध्ये AK-47 रायफल आढळल्या आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अलर्ट जारी केला आहे. संशयास्पद बोटीवर ३ एके-४७ रायफल्स, २२५ काडतुसं आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? ही बोट कोणाची आहे याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. या बोटीचं दहशतवाद्यांशी, इसिसशी काही संबंध आहे का याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती असून देशभरातल्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

रायगडच्या किनाऱ्यावर स्फोटकं

मुंबईचं एटीएस पथक, सीआययू पथक किंवा नार्कोटिक्स पथकाने यासाठीचा तपास सुरू केला आहे. २६/११, १९९३ चा बॉम्ब हल्ला हा समुद्र मार्गे येऊनच करण्यात आला होता. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही याचा तपास सुरू आहे. रायगडच्या किनाऱ्यावर याआधीही स्फोटकं आढळल्याचा इतिहास आहे. १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाआधी रायगड किनाऱ्यावरच स्फोटकं उतरवण्यात आली होती. २००८ मध्ये मुंबईतला दहशतवादी हल्ला समुद्रमार्गेच झाला होता. त्यामुळे रायगडची किनारपट्टी अतिशय संवेदनशील मानली जात असून या बोटींचा सखोल तपास सुरू आहे.

संशयित बोट

सकाळी ८ च्या सुमारास येथील ग्रामस्थांना समुद्रकिनारी एक बोट (Suspicious Boat Found On Raigad Shrivardhan Update) आढळली. त्यांनी बोट तपासली असता बोटीमध्ये काही पेट्या आढळल्या. स्पीड बोटीत १० बॉक्स आढळले आहेत. या पेट्यांमध्ये काही हत्यारही ग्रामस्थांना आढळली. ग्रामस्थांनी या बोटीबाबतची माहिती संबंधितांना दिल्यानंतर पुढील तपासाला सुरुवात झाली. समुद्रकिनारी आढळलेल्या या बोटीवर कोणीही माणसं नव्हती. ही स्पीड बोट असल्याची माहिती आहे.

पेट्यांवर कंपनीचा स्टीकर

या बोटीमध्ये हत्यार, काडतुसांसह इतरही काही वस्तू आढळल्या आहेत. कॉन्फरन्स टेबल, लाइव्ह जॅकेट यात आढळलं आहे. त्यामुळे या बोटीतून काही लोक प्रवास करत असल्याचा अंदाज आहे. बोटीत काही कागदपत्रही सापडली आहेत. या बोटीमध्ये काही पेट्या सापडल्या आहेत. या पेट्यांवर एका कंपनीचा स्टीकर आढळून आला आहे. हा स्टिकर एका सिक्युरिटी कंपनीचा आहे. ही बोट लंडन, युकेची असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा – मोठी बातमी: कोकणातील समुद्र किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडली; हायअलर्ट जारी

‘नागरिकांनी घाबरुन जाऊ नये’

राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने सर्व यंत्रणेच्या मार्फत या बोटीचा सखोल तपास केला जाणं अत्यंत आवश्यक असल्याचं सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. देशाच्या, राज्याच्या, रायगड जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असून सर्व यंत्रणांचं लक्ष याकडे केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. अशी घातक शस्त्रास्त्र आपल्या किनारपट्टीवर येऊ नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना यापूर्वी केल्या गेल्या होत्या, काही यंत्रणा स्थापित केल्या आहेत त्याकडेही लक्ष द्यावं, कारण अशाप्रकारे बोट समुद्रकिनारी येणं याचा तपास करणं गरजेचं आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहनही तटकरेंनी केलं आहे.

रायगडमध्ये हाय अलर्ट जारी

रायगडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच रायगडच्या लँडिंग पॉईंटवर बंदोबस्त वाढलण्यात आला आहे. स्वतंत्र्य टीम नेमून चौकशी करा, तातडीची बैठक बोलावून उपाययोजना करावी अशी मागणी अदिती तटकरे यांनी केली आहे. रेड अलर्ट जारी करुन रायगडच्या जनतेच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशीही मागणी श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांनी केली आहे. आता या बोटीवर आढळलेल्या रायफल, बोट, बोटीत आढळलेली कागदपत्र, पेट्यांवरील स्टिकर यांचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here