रायगड: रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये शस्त्रास्त्रं असलेली बोट आढळल्यानं एकच खळबळ उडाली. बोटीमध्ये एकही व्यक्ती नव्हती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं ती किनाऱ्यावर आणली. या बोटीत तीन एके-४७ रायफल्स आणि २२५ काडतुसं आढळून आली. हरिहरेश्वरपासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भरडखोल किनाऱ्यावर आणखी एक बोट आढळून आली आहे.

रायगडच्या किनाऱ्यावर दोन बोटी आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भरडखोलमध्ये सापडलेल्या बोटीत काही कागदपत्रं आणि लाईफ जॅकेट्स आढळून आली आहेत. या बोटीमध्येही कोणीही नव्हतं. त्यामुळे या बोटीत नेमकं कोण होतं? जॅकेट्स वापरणारे कुठे गेले?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
आमची बोट बुडालीय! शस्त्रास्त्रं आढळून आलेल्या बोट कंपनीच्या दाव्यानं नवा ट्विस्ट?
बोट कोणाची, रायगडमध्ये कशी आली? फडणवीसांनी दिली माहिती
हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीचं नाव लेरिहान असून ती ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची होती. महिलेचे पती जेम्स हार्बर्ट या बोटीचे कप्तान होते. ही बोट मस्कतहून युरोपच्या दिशेनं जात होती. मात्र, २६ जून रोजी सकाळी १० वाजता ही बोट समुद्रात भरकटली होती. त्यानंतर बोटीवरील खलाशांनी मदतासाठी कॉल दिला. त्यावेळी एका कोरियन युद्धनौकेने या बोटीवरील खलाशांची सुटका केली व त्यांना ओमानच्या स्वाधीन केलं होतं. परंतु, तेव्हा समुद्र खवळला असल्यानं बोटीचं टोईंग करता आलं नव्हतं. त्यानंतर समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे ही नौका हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली, अशी माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेली बोट, शस्त्रास्त्रं कोणाची? समोर आली महत्त्वाची माहिती
सुरक्षेचा प्रश्न, चौकशी व्हावी; तटकरेंची मागणी
रायगडच्या किनाऱ्यावर अशा प्रकारे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण घटनेची तपास यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी केली आहे. १९९३ मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर पुढे काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे या बोटीचा तपास व्हायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारनं यंत्रणांच्या माध्यमातून याचा तपास करायला हवा, असं तटकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here