दारू पिण्यासाठी मुलगा नेहमी त्रास द्यायचा, शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून हत्येची सुपारी दिल्याची कबुली शोभाबाई यांनी दिली. हत्येसाठी ६० हजार ठरले होते. त्यापैकी १० हजार रुपये शोभाबाई यांनी मारेकऱ्यांना दिले होते. सुशीलला दारूचे व्यसन जडले होते. दारू पिण्यासाठी तो घरातील काही वस्तूदेखील विकत होता. दारू पिण्यासाठी पैसे नाही दिले तर तो आपल्या आई-वडिलांना देखील मारहाण करायचा. सुशीलचा हा त्रास दररोज असायचा. आई सुशीलच्या त्रासाला कंटाळली होती.
आपल्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाचा त्रास अखेर सहन न झाल्याने आई शोभाबाईने आपल्या पोटच्या मुलाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सुशीलला संपवण्यासाठी शोभाबाईने तिच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूंची मदत घेतली. शोभाबाई यांच्या घरात भाड्याने राहत असलेले राजेश पाटील आणि देवराव भगत हत्या करण्यास तयार झाले. शोभाबाईंनी सुशीलला मारण्यासाठी ६० हजार रुपयांची सुपारी दिली. यातील १० हजार रुपयेदेखील देण्यात आले.
राजेश पाटील आणि देवराव भगत यांनी सुशीलला दारू पिण्यास नेले. सुशीलला दारू पाजून त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. नांदेड ते भोकर या महामार्गावरील एका झुडूपात सुशीलचा मृतदेह फेकून देण्यात आला. या घटनेची माहिती बारड पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी बारड पोलीस पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला. सुशीलच्या डोक्याला आणि अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता धक्कादायक माहिती समोर आली. आईनेच आपल्या मुलाचा काटा काढल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. आई शोभाबाई श्रीमंगलेसह खून करणाऱ्या राजेश पाटील आणि देवराव भगत याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यसनाधीन मुलाचा आईनेच काटा काढल्याने खळबळ उडाली आहे.