आठवले खाजगी कामासाठी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुन्हा एकदा शिर्डीतून लढण्याचा विषय निघाला. त्यावर ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून नगर व शिर्डी येथे मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यात येतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी २०२४ मध्ये लढण्यात इच्छुक आहे. यावेळेस लढणार आहे पण पडणार नाही. २००९ मध्ये नगरची जागा राष्ट्रवादीने बाळासाहेब विखेंना दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी शिर्डीत फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मला पराभव पत्करावा लागला. नंतर राज्यसभेचे सदस्य व्हावे लागले. परंतु आता मी २०२४ च्या निवडणुकीत शिर्डीमधूनच उभा राहणार असून येथून चांगल्या मतांनी निवडून येईल, असा मला विश्वास वाटतो, असेही आठवले म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय समितीतून वगळल्याबद्दल ते म्हणाले, गडकरींना नवीन जबाबदारी मिळेल. ते देशातील मोठे नेते आहेत. भाजपने त्यांना दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. देशभरात रस्त्यांचे उत्कृष्ट जाळे निर्माण करून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत राज्यातून एकच नाव द्यायचे असते. त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस यांचे नाव दिल्याने गडकरींचे नाव वगळले असावे. परंतु त्यांना यापेक्षाही मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे, असेही आठवले म्हणाले.
बिहारमधील राजकीय घडामोडींवरही आठवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्याने बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली असे म्हणण्यात तथ्य नाही. नितीशकुमार यांचा असे डावपेच खेळण्याचा स्वभाव आहे. या आधीचे लालूप्रसाद यादवांबरोबर होते नंतर भाजप बरोबर आले व आता पुन्हा राष्ट्रीय जनता दलाबरोबर गेलेत. दोन वर्षात ते पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात”.
“पंतप्रधान पदासाठी नितीशकुमार लालूप्रसाद यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, चंद्रशेखर राव, शरद पवार असे अनेक चेहरे पुढे आणले जात असले तरी पंतप्रधानपद मिळवणे सोपे नाही. भाजप मित्र पक्षांना संपवत नाही तर काही मित्रपक्षच भाजपला धोका देतात. माझा छोटा पक्ष असूनही केवळ भाजपमुळे तो देशात वाढत आहे”, असेही आठवले म्हणाले.