देगलूर तालुक्यातील देगाव येथून प्रवासी घेऊन नांदेडकडे येणाऱ्या क्रूझर जीपचा टायर फुटून कृष्णूरजवळ गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागेवरच ठार झाले असून आठ गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच नागरिकांनी धावपळ करून जखमींना मदत केली.
देगलूर तालुक्यातील देगाव येथून आणि इतर ठिकाणाहून प्रवासी घेऊन क्रूझर जीप गुरुवारी नांदेडकडे निघाली. भरधाव वेगात निघालेली क्रूझर सायंकाळी पाचच्या सुमारास कृष्णूरजवळ अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगात असलेल्या क्रूझरचा टायर फुटून क्रूझर रस्त्यालगतच्या खड्ड्यांमध्ये जाऊन उलटली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मृत्यमुखी पडलेल्यांमध्ये आमदबी शे. खुलताबी (वय ५०, रा.देगाव), मेहबूब बाबूशेख (वय ४५, रा.गोजेगाव मुक्रमाबाद) यांचा समावेश आहे. अपघात होताच जखमी प्रवाशांनी आक्रोश केला. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त क्रूझर जीपकडे धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पुरी यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. मागील काही महिन्यांपासून नायगाव, कुंटूर, रामतीर्थ, कृष्णूर, नरसी या भागांमधून प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशांना घेण्याच्या चढाओढीत वेगमर्यादा ओलांडून ही वाहने चालवली जात आहेत. यातूनच अनेक गंभीर अपघात होत आहेत. देगाव येथून निघालेली क्रूझरदेखील भरधाव वेगात होती. टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.