आजचे भाजपसम्राट मोदी हे काही वर्षांपूर्वीपर्यंत या ‘सर्वोच्च संसदीय मंडळा’चे साधे सदस्यही नव्हते; मात्र त्यांनी लागोपाठ दोन वेळा भाजपला केंद्रात सत्तास्थानी आणले. तेव्हा त्यांना मनाप्रमाणे सध्या तरी पक्ष व सरकार चालविता यावे, हा ज्येष्ठ नेते यांना संसदीय मंडळातून मिळालेल्या निरोपाचा अर्थ आहे. याचा अर्थ, गडकरी यांची राजकीय कारकीर्द संपली असा नाही. कधी वाजपेयी, तर कधी अडवाणी यांना विरोध करीत राहिलेले मुरली मनोहर जोशी कायम केंद्रीय वर्तुळात राहिलेच. आजही भाजपचे जे (सुप्तावस्थेतील) मार्गदर्शक मंडळ आहे; त्यात मोदी, अडवाणी, जोशी आणि राजनाथ सिंह असे चार सदस्य सध्या आहेत. तेव्हा या मंडळात जाणे, याचाही अर्थ राजकारण संपणे असा नाही.
संसदीय मंडळ किंवा निवडणूक समितीमधील नावे पाहिली, तर मोदी व शहा ही दोनच नावे महत्त्वाची आहेत. इतर सर्वांना त्यांच्या इच्छेने स्थान मिळाले आहे. त्यात एकही निवडणूक जिंकू न शकलेले किंवा केवळ एखाद्या राज्याला प्रतिनिधित्व द्यायचे म्हणून प्रतीक रूपाने तेथे आहेत. यातले देवेंद्र फडणवीस यांचे नाव म्हणजे त्यांच्यावरच्या मोदींच्या विश्वासाची खूण आहे. फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजपचे सर्वांत महत्त्वाचे नेते आहेत, असा संदेश मोदींनी पुन्हा दिला आहे. तो मुख्यत: राज्य भाजपसाठी; तसेच फडणवीस यांच्याबद्दल अढी असू शकणाऱ्या अमराठी केंद्रीय नेत्यांनाही आहे. दक्षिणेतील भाजपची स्थिती व बिहारमधील अवनती यामुळे ४८ खासदारांच्या महाराष्ट्राचे महत्त्व कुणालाही समजू शकेल. याच कारणामुळे, कर्नाटकचे एके काळी पक्षाने ओवाळून टाकलेले नेते येदियुरप्पा हे दोन्ही समित्यांमध्ये आले आहेत. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले, तेव्हा प्रमोद महाजन नव्हते. दुर्दैवाने, गोपीनाथ मुंडेही लगेचच गेले. तेव्हा, मोदींच्या पहिल्या कार्यकाळात गडकरी यांना संरक्षण किंवा गृह खाते मिळाले नसले, तरी त्यांचे महत्त्व अबाधित होते. अनेक महत्त्वाची खाती होती. त्यांनी कामही खूप केले. आजही ते करीत आहेत; मात्र मोदी पुन्हा निवडून आल्यापासून गडकरींचे महत्त्व क्रमाक्रमाने उणावत गेले. यात २०१९च्या मोदींच्या निर्विवाद विजयाचा जसा वाटा आहे; तसाच गडकरी यांच्या छुप्या असहकाराचाही आहे.
राजनाथ सिंह यांनी मनात असो-नसो मोदी-शहा यांचा अंतिम शब्द मान्य केल्याचे दिसते. गडकरी यांनी तसे केलेले नाही, हे लपत नाही. ‘आपण हे आत्ता बोललेच पाहिजे का,’ याचा विचार केला नाही, तरच आपली निर्भीडता व सडेतोडपणा सिद्ध होतो, असे नाही. कुणाला महत्त्वाकांक्षा असणे चूक नाही आणि कधी कधी पक्षाचे अपुरे यश हे सामोपचारी नेत्यांचे मात्र यश, अशी स्थितीही येऊ शकते. अडवाणी यांच्याऐवजी वाजपेयी त्यामुळेच तर पंतप्रधान झाले; पण राजकारणात क्षणोक्षणी परिस्थिती बदलते. केवळ भाजपचा विचार केला, तरी नरेंद्र मोदी हे इतर सर्व नेत्यांपेक्षा कैक योजने कधीच पुढे निघून गेले आहेत. त्यांचे नेतृत्व सर्वांनी नि:शंक मनाने मान्य करावे किंवा निदान शांत राहावे, असे संघातील धुरिणांनाही वाटत असल्यास नवल नाही. काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी ‘आता कधी कधी राजकारण सोडून द्यावेसे वाटते,’ अशी भावना व्यक्त केली होती; पण राजकारणात ‘परतीचे दोर’ कधीही नसतात. नितीन गडकरी यांनाही हा एक प्रवासातला मैलाचा दगड म्हणून पुढे वाटचाल करावी लागेल. राजधानीत कर्तबगार मराठी नेत्यांची मानखंडना करण्याची परंपरा स्वातंत्र्यापासूनच आहे. ती मात्र कधी तरी खंडित व्हायला हवी.