रणजीतसिंह निंबाळकर यांनी गुरुवारी यासंदर्भात ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, घोटाळ्यांच्या चौकशीबाबत सरकारला काय वाटते, ते महत्त्वाचे आहे. मी व्यक्तीद्वेष करत नाही. मला त्यामध्ये रस नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते चोर आहेत. त्यामुळे मोहित कंबोज बोलतायत तो चोर नेमका कोण आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच कळेल. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित अनेक विषय आहेत. नुकतंच लवासा प्रकल्पासाठीच्या जमीन हस्तांतरणावरून सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना फटकारले आहे. त्या काळात जलसंपदा मंत्री कोण होते? जमिनी कशा दिल्या? त्याचे निकष काय होते?, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता लवासा प्रकरणातच चौकशी होते की अन्य विषयावर, हे बघावे लागेल, असे रणजीतसिंह निंबाळकर यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोप झाले आहेत. त्यामध्ये कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे आता चौकशी केल्यानंतरच योग्य गोष्टी पुढे येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० पैकी किमान ५ नेत्यांना तरी ईडीकडून नोटीस येऊ शकते, असे रणजीतसिंह निंबाळकर यांनी सांगितले.
मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?
मोहित कंबोज यांनी अलीकडेच काही ट्विटस केली होती. या माध्यमातून मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले होते. ट्विटमध्ये कंबोज यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांची नावं लिहली आहेत. त्यानंतर कंबोज यांनी पाचवी जागा रिक्त सोडली आहे. याठिकाणी लवकरच एका नेत्याचा नंबर लागेल, असे संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.