रत्नागिरी : कोकणात आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात चर्चेत राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात यावर्षी लाखो रुपयांच्या बक्षिसांची चढाओढ पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचा दापोली हा विधानसभा मतदारसंघ आहे. कदम गटाकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सूर्यकांत दळवी यांनीही टक्कर देण्यासाठी दहीहंडी उत्सवात दरवर्षी १ लाख रुपयांचे असलेले बक्षीस यंदा ३ लाख ५१ हजार रुपये इतकं ठेवलं आहे.

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी या पारंपरिक वादाची कायम किनार राहिली आहे. दहीहंडी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट व शिवसेनेनं बॅनरबाजीतून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. आमदार योगेश कदम यांनी ३ लाख ३३ हजार ३५१ रुपये तर माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाकडून तब्बल ३ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस असलेली दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. ही दहीहंडी आता कोणत्या गोविंदा पथकाकडे जाणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी तयार, पण शिंदे गटाला मिळणार फक्त तीन जागा?

आमदार योगेश कदम यांनी यापूर्वीही इतक्याच रक्कमेच बक्षीस असलेली दहीहंडी २०१७ सालीही आयोजित केली होती. त्यापुढील वर्षी दापोलीत एका बस अपघातात ३० जण मृत्युमुखी पडल्याने सगळे उत्सव रद्द करण्यात आले होते. दोन वर्षे करोनामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. आता यंदा हा दहीहंडी उत्सव रंगणार आहे. या दोन्ही दहीहंडी उत्सवात मराठमोळ्या लावणी नृत्याचा कार्यक्रम हे खास आकर्षण आहे. योगेश कदम पुरस्कृत दहीहंडी कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांचा लावण्यांचा कार्यक्रम आहे तर तिकडे शिवसेनेकडून आयोजित दहीहंडी उत्सवातही लावण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here