बुधवारी लष्कराकडून गुवाहाटी येथे कार्यरत सचिन यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली. मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेह पुणे मार्गे आज राक्षी येथे आणण्यात येत असून, सकाळी अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
सचिन यांचे प्राथमिक शिक्षण राक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे घेतल्यानंतर ते लष्करात २०११ ला भरती झाले. त्यांचे बंधू प्रवीण हेही त्याच दरम्यान भरती झाले आहेत. ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. सचिन यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर आजी गंगूबाई सुखदेव जगधने यांना धक्का बसला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यार गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन यांचे बंधू प्रवीण सध्या सुट्टीवर गावी आलेले आहेत.
सुट्टी संपवून निघण्याच्या तयारीत असतानाच भावाच्या मृत्यूची बातमी समजली. त्यामुळे त्यांनाही याचा धक्का सहन झाला नाही. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्यात आले. गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. सचिन यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.